दोघा भावांना टोळक्याने संपवलं

नाशिक : शहरात जोरदार रंगपंचमी साजरी होत असतानाच धक्कादायक माहिती हाती येत असून आधीच्या वादातून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबेडकर वाडी परिसरात टोळक्याकडून दोन सख्या भावांची हत्या करण्यात आल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबेडकरवाडी येथील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उमेश (मन्ना) जाधव व प्रशांत जाधव या दोन भावांवर त्यांच्याच घरासमोर त्याच परिसरात राहणाऱ्या टोळक्याने धारदार कोयत्याने जोरदार हल्ला केला. एकापेक्षा अधिक वार केल्याने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोघे कोसळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत,सहायक पोलिस आयुक्त डॉ सचिन बारी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड,उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनिरीक्षक संजीव फुलपगारे,गुन्हे शोध पथकाचे प्रभाकर सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळावरून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अतिरक्त रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. काही दिवसांपूर्वी होळी सणाच्या पूर्वसंध्येला सिडको परिसरात टोळक्याने एका तरुणाची भररस्त्यात हत्या केली असतानाच आज रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला उपनगर परिसरात दोघा भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

![]()















