दोन संकटमोचक उतरुनही यश नाहीच

नाशिक : विधानपरिषद निवडणुकीत अर्ज भरण्यापासून माघार घेण्यापर्यंत अनेक ट्विस्ट येत आहेत. त्यात आज भाजपचे मालेगावचे बंडखोर नेते प्रसाद हिरे हे आज थेट नाशिकमधील भाजप कार्यालयात दाखल झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे व महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपच्या दोन नेत्यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. यातच आता भाजपचे मालेगावचे बंडखोर नेते प्रसाद हिरे यांनी थेट भाजप कार्यालयात जात, मला माघार घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मंत्री गिरीश महाजन यांनी कोणतीही सूचना केली नसल्याचे सांगत धक्कादायक खुलासा केल्याने राजकीय वर्तुळात व महायुती मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.प्रसाद हिरे यांनी थेट भाजप कार्यालयात हजेरी लावत त्यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे “हा माझा पक्ष आहे आणि हे माझे कार्यालय आहे. यासाठीच मी भाजप शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी येथे आलो होतो. मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही, माझा विजय नक्की आहे. दुसरीकडे, भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे. बंडखोरीचे हे वादळ शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांना अपयश आले आहे. सध्या हे दोन्ही नेते गोकुळ गीते यांची मनधरणी करून त्यांचा जाहीर पाठिंबा मिळवण्याची रणनीती आखत असल्याचे चित्र आहे. मात्र गोकुळ गीतेंनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत, “जाहीर पाठिंबा देण्याचा विषयच येत नाही, निवडणूक खूप पुढे गेली आहे,” अशा शब्दात सुनावल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेत चलबिचल सुरू झाली आहे.त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीते आणि भाजपचे प्रसाद हिरे असा अटीतटीचा तिरंगी सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

![]()















