भाजप नेत्याचा आकडेवारीसह खळबळजनक दावा

नाशिक : सोशल मीडियावरील एक उपरोधात्मक चळवळ म्हणून सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ला देशाच्या राजकीय पटलावर चर्चेत येण्यासाठी फारसा वेळ लागला नाही. सुरुवातीला निव्वळ एक डिजिटल विनोद म्हणून पाहिली जाणारी ही ‘पार्टी’ आता थेट राजकीय नेत्यांच्या टीकेचे लक्ष्य बनली आहे. काही विश्लेषक याला देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा संताप मानत आहेत, तर काहींनी याकडे एक नवा राजकीय पर्याय म्हणून पाहिले आहे. दरम्यान, या डिजिटल पक्षाच्या फॉलोअर्सच्या संख्येने भाजपलाही मागे टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आता या पक्षाचे थेट ‘पाकिस्तान कनेक्शन’ असल्याचा खळबळजनक दावा दिल्लीतील एका भाजप नेत्यांने आकडेवारीसह केला आहे. भाजप नेत्याचा मोठा दावा
या डिजिटल पक्षाला सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळत असून, अवघ्या पाच दिवसांत त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर तब्बल १.५ कोटी (15 Million) फॉलोअर्स जोडले गेले आहेत. फॉलोअर्सच्या या वेगामुळे या पेजने भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजलाही मागे टाकले आहे. हे प्रकरण वाढल्यानंतर या पक्षाचे ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट देखील ब्लॉक करण्यात आले होते. आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, दिल्लीतील एका भाजप नेत्यांने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या पक्षाला थेट ‘पाकिस्तान जनता पार्टी’ असे संबोधले आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी ‘सीजेपी’च्या सोशल मीडिया अकाऊंटचा ‘इन्साइट डेटा’ आणि एक ‘पायचार्ट’ देखील शेअर केला आहे. कोणत्या देशात किती टक्के फॉलोअर्स? पाहा आकडेवारी: पाकिस्तान: ४९ टक्के
अमेरिका (USA): १४ टक्के
बांगलादेश: १४ टक्के
भारत (India): ९ टक्के
ब्रिटन (UK): ३ टक्के
ऑस्ट्रेलिया: ३ टक्के
सौदी अरेबिया: ३ टक्के
संयुक्त अरब अमिराती (UAE): २ टक्के
इतर देश: ३ टक्के आकडेवारीनुसार, कॉकरोच जनता पार्टीचे भारतात अवघे ९ टक्के फॉलोअर्स असून, तब्बल ४९ टक्के फॉलोअर्स हे एकट्या पाकिस्तानातील आहेत, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यानंतर सोशल मीडिया युजर्सकडून विविध प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दीपके यांनी दिले स्पष्टीकरण
फॉलोअर्स पाकिस्तानी असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर दीपके यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दीपके यांनी एक आकडेवारी शेअर करत ९४.७ टक्के फॉलोअर्स भारतीय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, “मला माहित आहे की तुम्ही खाते हॅक करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहात, पण तुम्ही त्यात अयशस्वी झाला आहात. म्हणून मी तुम्हाला खरी माहिती देतो. तुम्ही ९४ टक्के भारतीय तरुणांना पाकिस्तानी का म्हणाल?”, या शब्दात टीकेला उत्तर दिले. एक्स हँडल सस्पेन्ड
दरम्यान, आज सकाळी कॉक्रोच जनता पार्टीचे अधिकृत एक्स हँडल सस्पेन्ड करण्यात आले. यानंतर काही वेळाच पुन्हा दुसरे खाते सुरु करण्यात आले. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या एक्स खात्याला देखील काही तासांत जवळपास ७० हजार नेटकऱ्यांनी फॉलो केले आहे. कॉक्रोच जनता पार्टीला अवघ्या काही दिवसांत १६.६ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.


![]()















