हा थरार प्रेम प्रकरणातून आणि जुन्या वादातून

नाशिक : ( ब्लॅक अँड व्हाईट मीडिया ) आडगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलजवळील पुलाखाली रविवारी (दि. १८) दुपारी जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने तरुणावर पिस्तुलातून दोन वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र मिसफायर झाल्याने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार संशयित राहुल आंबेकर याने त्याच्याकडील बंदुकीतुन फिर्यादी उमेश ऊर्फ कैलास माळोदे याच्यावर दोन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा फिर्यादीने गोळी चुकविल्यामुळे माळोदे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमागे काही महिन्यांपूर्वी संशयित राहुल आंबेकर आणि फिर्यादीची पत्नी एकाच कंपनीत काम करत होते. यावेळी संशयिताकडून पत्नीला त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. यावरून फिर्यादीने काही महिन्यांपूर्वी संशयिताला जाब विचारला होता. त्यानंतर पत्नीने संबंधित कंपनीतील कामही बंद केले होते. याच घटनेचा राग मनात धरून संशयिताने रविवारी संधी साधत फिर्यादीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.या प्रकरणात एकूण दोन संशयितांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे संशयित नाशिक रोड-जेलरोड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ च्या मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस हवालदार निलेश काटकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


![]()












