विकासाच्या नावाखाली त्र्यंबकला भकास करू नका नागरिकांनी केली नाराजी व्यक्त

नाशिक : ( ब्लॅक अँड व्हाईट मीडिया ) शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी विशेष नगरसभेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. यावेळी त्रंबकेश्वर येथील नागरिकांनी विकास कामे होताना प्रशासनाकडून स्थानिकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा विरोध दर्शवितानाच विकासाच्या नावाखाली गाव भकास करू नका असे सांगितले. नगरसभेला कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्तां बरोबरच जिल्हाधिकारी अनुपस्थित राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नगर परिषदेच्या वतीने येथील केशव मंगल कार्यालयात नगरसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परंतु दोन्ही अधिकाऱ्यांनी सभेकडे पाठ फिरवली. सभेला महंत शंकरानंद सरस्वती, महंत दुर्गादासजी, महंत दुर्गानंद ब्रह्मचारी, महंत दानमुनी, आदींसह विविध आखाड्यांचे साधू महंत उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार हिरामण खोसकर, नगर अध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, उपनगराध्यक्ष पल्लवी शिरसाट, तहसीलदार गणेश जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.यादरम्यान नागरिकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ सत्यप्रिय शुक्ल यांनी विकास कामे करत असताना पिढ्या-पिढ्या राहिलेल्या घरातून ग्रामस्थांना विस्थापित व्हावे लागणार असल्याने संताप व्यक्त केला तर अनंत उपाध्याय यांनी गाळेधारकांचे आधी पुनर्वसन करा व त्यानंतर गाळे तोडा असे सांगितले. त्यानंतर गाळे तोडताना कोणती विकास कामे करणार याची माहिती जनतेला देण्याची मागणी दिलीप बागडे यांनी केली. नगरपरिषदेच्या कामांची माहिती देण्याची मागणी एन डी गंगापुत्र यांनी केली. सुनील लोहगावकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधले. कुंभमेळा आयुक्त जिल्हाधिकारी उपस्थित नसल्यामुळे या सभेचा उद्देश साध्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नाना दोंदे यांनी कामगारांना उध्वस्त न करण्याची मागणी केली. मंगेश धारणे यांनी आपली 30 एकरची शेती आता 10 गुंठावर आल्याचे सांगितले. त्र्यंबक मध्ये विकास कामांमुळे सध्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे निवृत्तीनाथ मंदिरापासून ते त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत सध्या प्रसाधनगृहाची व्यवस्था कोठेच नसल्याची तक्रार करण्यात आली.


![]()












