कोरोना महामारीच्या काळात मृत्यू पावलेले २२ रुग्ण पुन्हा जिवंत असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले

नाशिक : (ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा) शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या 22 रुग्णांवर तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा उपचार केल्याचे भासवून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. आयुष्मान भारत योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या नावाखाली हा 2 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असून, याप्रकरणी नाशिकमधील तीन नामांकित रुग्णालयांच्या संचालकांवर मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 वर्षांपूर्वी मृत झालेल्यांवर कागदोपत्री ‘पुन्हा’ उपचार!
कोरोनाच्या भीषण काळात ज्या 22 दुर्दैवी रुग्णांचा मृत्यू झाला होता, ते रुग्ण जिवंत असल्याचे दाखवून त्यांच्या नावावर तब्बल 6 वर्षांनंतर शासकीय योजनांतर्गत खोटे क्लेम दाखल करण्यात आले. या तिन्ही रुग्णालयांनी वैद्यकीय कागदपत्रांमध्ये हेरफेर केली आणि शासनाकडून सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी लाटला. विधानमंडळाच्या अधिवेशनात आमदार डॉ. राहुल आहेर यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. या घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सध्या या एसआयटीकडून या संपूर्ण प्रकरणाचा स्वतंत्र आणि सखोल तपास सुरू आहे. मृत रुग्णांच्या नावावर बोगस क्लेम करून निधी लाटणाऱ्या या रॅकेटमध्ये केवळ रुग्णालयांचे संचालकच नव्हे, तर आरोग्य विभागातील आणि शासकीय यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 392 प्रकरणे खोटी आढळली समितीचा प्राथमिक चौकशी अहवाल ऋषिकेश हॉस्पिटल (गंगापूररोड) संस्थापक प्रशांत जाधव व प्रीतम पाचपुते यांनी 72 बोगस प्रकरणांद्वारे 45 लाख 45 हजार 750 रुपयांचा अपहार केला. 8 मृत व्यक्तींच्या नावे बनावट उपचार दाखवले.
शिव मल्टिस्पेशालिटी (सातपूर): संचालक डॉ. त्रिलोक पाटील व राहुल पाटील यांनी 163 बोगस प्रकरणांद्वारे 71 लाख 83 हजार 600 रुपये लाटले. 7 मृत व्यक्तींच्या नावे उपचार दाखवल्याचे उघड झाले.
नाशिक ग्रेस हॉस्पिटल (सिडको) : संचालक राहुल श्रीराम पाटील व अधिकृत स्वाक्षरीकर्ता सागर पाटील यांनी 126 बोगस प्रकरणांद्वारे 62 लाख 13 हजार 600 रुपये लाटले. यात 7 मृत व्यक्तींची नावे वापरली.


![]()












