शिंदे गटाच्या शिवसेनेला गीतेबंधूंची धास्ती

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली होती. वाटाघाटीत ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळाली मात्र मित्र पक्ष असलेल्या भाजपात झालेली बंडखोरी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने उमेदवार न देण्याची केलेली खेळी यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्यासमोर आव्हान उभे ठाकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात माघारीची मुदत उद्या (गुरुवारी) संपत असताना मित्रपक्षातील बंडखोरीमुळे शिंदे गटाच्या शिवसेनेची चिंता वाढली आहे. शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये तळ ठोकून असून माघारीसाठी बंडखोरांची त्यांनी मनधरणी केली यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी बंडखोरांशी भ्रमणध्वनीवर संपर्क केल्याची माहिती मिळत आहे. बंडखोरी करणारे भाजपचे गणेश गिते आणि त्यांचे बंधू गोकूळ गिते यांची समजूत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन काढतील आणि त्यांची माघारी होईल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला आहे. आपल्या मार्गातील अडसर दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गट सक्रिय झाला असून त्यांची संपूर्ण आशा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर असल्याचे चित्र आहे. भाजपचे प्राबल्य असणाऱ्या या मतदारसंघात नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यात भाजपशी संबंधित गणेश गिते, त्यांचे बंधू गोकूळ गिते तसेच प्रसाद हिरे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवृत्ती बोडके आणि विष्णू म्हैसधुणे यांचाही समावेश आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला गीते बंधूंची भीती महापालिकेचे माजी स्थायी सभापती गणेश गिते आणि त्यांचे बंधू गोकूळ हे निवडणुकीवर विविध मार्गाने प्रभाव टाकू शकतात, हे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या लक्षात आल्यावर त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी मुंबई सोडत मंत्री उदय सामंत यांनी नाशिकला ठाण मांडत बंडखोरांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. गणेश गिते हे नाशिकमध्ये असते तर आपण त्यांचीही भेट घेतली असती, असे सामंत म्हणाले. गणेश गिते हे मुंबईत असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याची आपली माहिती आहे. गिते बंधूंची उमेदवारी मागे घेण्यासाठी मंत्री महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. ते चर्चा करून समजूत काढतील. गिते बंधू हे माघार घेतील आणि नरेंद्र दराडे यांचा विजय सुकर होईल, ही आम्हाला खात्री आहे. असेही मंत्री सामंत म्हणाले. तर दुसरीकडे मविआ (उद्धव ठाकरे गट) कडून सुरुवातीला चुरस निर्माण होईल असे वाटत होते, पण नंतर त्यांनी ऐनवेळी आपला उमेदवार रिंगणातून मागे घेतल्याने निवडणुकीच्या समीकरणात मोठा बदल झाला आहे याठिकाणी नगरसेवकांमध्ये संताप असून पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदानाचा अधिकार असलेल्या नगरसेवकांच्या मते, किमान उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत निवडणुकीची उत्सुकता कायम ठेवायला हवी होती. अशी चर्चा आहे


![]()















