
नाशिक- मधील मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात उभारण्यात येत असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या शनिवार, दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे.
या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पांचे उद्या राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, पालकमंत्री मा. दादाजी भुसे, ग्रामविकास व पर्यटन मंत्री मा. गिरीशजी महाजन, विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहचवून ते रुजविण्याच्या उदात्त हेतूने हे स्मारक उभारण्यात येत आहे. मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात स्मारक उभारण्याची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची अनेक वर्षांची मागणी व पाठपुराव्यानंतर नाशिक महानगरपालिकेकडून अर्थसंकल्पात या स्मारकासाठी तरतूद करण्यात आली.
स्मारकाच्या मंजुरीनंतर मुंबई नाका परिसरात वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, या दृष्टीने प्रकल्पाचे संकल्पचित्र बनविण्यात आले. तसेच वाहतुकीच्या दृष्टीने अन्य काही बदल करण्यात आले असून या ठिकाणी सिग्नल यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही अडथळा न होता येथील वाहतुकीचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.
या स्मारकासाठीचे पुतळे उभे किंवा अर्धाकृती करण्यात यावेत, यावर विचार विनिमय करण्यात आला. आजवर विविध ठिकाणी उभे पुतळे निर्माण केले गेले आहे. ते अतिशय उंच असल्याने त्याची निगा देखील राखणे कठीण होते. त्यामुळे व्यवस्थित निगा राखली जावी यादृष्टीने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वाधिक उंचीचे अर्धाकृती पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोकणातील कुडाळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ यांनी ११ महिने कालावधीत अर्धाकृती ब्राँझ धातूचे शिल्प तयार केले. या पुतळ्यांसाठी राजस्थानी कारागिरांकडून ग्रॅनाईट मार्बलमध्ये भव्य चौथरा उभारण्यात आला आहे. तसेच आर्किटेक्ट शाम लोंढे यांनी सल्लागार म्हणून स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पार पाडली. या स्मारकाचे काम सुरू असताना मी व समीर भुजबळ यांनी वेळोवेळी पाहणी करत काम दर्जेदार होण्याबाबत दक्षता घेतली.
सुमारे २७१० मीटर जागेवर हे स्मारक उभारण्यात आले असून यामध्ये महात्मा फुले यांचा १८ फुट उंच तर सावित्रीमाई फुले यांचा १६.५० फुट उंच पुतळा असणार आहे. या दोन्ही पुतळ्यांची रुंदी प्रत्येकी १४ फूट आहे. पुतळा परिसरात विशेष प्रकाश योजना करण्यात आली असून त्याचा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच सुसज्ज वाहतूक बेट, पाण्याचे कारंजे निर्माण करण्यात येऊन सर्व स्मारक परिसरात गार्डन व सुशोभिकरण करण्यात आले आहे.
असे हे स्मारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या थोर कार्याची आठवण करून देण्याबरोबरच आपल्या नाशिक नगरीच्या सौंदर्यात देखील मोलाची भर घालणार आहे. आपण सर्वांनी या लोकार्पण सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
या सोहळ्यास खा. राजाभाऊ वाजे, आ. सत्यजीत तांबे, आ. किशोर दराडे, आ. देवायानीताई फरांदे, आ. सीमाताई हिरे, आ. राहुल ढीकले, आ. सरोज अहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार वसंत गिते, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रवीण तिदमे, गजानन शेलार, प्रशांत जाधव, सुदाम कोंबडे, सुधाकर बडगुजर, आकाश छाजेड, डॉ. डी. एल. कराड, प्रकाश लोंढे, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर व विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.


![]()














