जखमी पोलीस अधिकारी जमावात शिरल्याने परिस्थिती आली नियंत्रणात

नाशिक : राजकिय अस्थिरतेनंतर बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात काल सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला दुकानदारांनी उस्फुर्त प्रतिसाद देत सकाळपासून दुकाने बंद ठेवली होती. मात्र दुपारनंतर या बंदला जुन्या नाशिक परिसरात हिंसक वळण लागले.जुन्या नाशकातील भद्रकाली परिसरात दुकाने सुरू असल्याचे समजल्यानंतर बंदचे आवाहन करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांचे वाद झाले. त्यानंतर दोन गट आमने-सामने आल्याने मोठ्या वादाला सुरवात झाली यावेळी एक जमाव हा भद्रकाली पोलीस ठाण्याच्या परिसरात जमा झाला होता. तर दुसरा जमाव हा साक्षी गणेश मंदिराजवळ जमा झाला होता. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत एकत्रित निवेदन दिले. तर दुसरीकडे तिवंधा चौकातून वर गेलेला जमाव व बडी दर्गा परिसरात असलेला जमाव यांच्यात तुफान दगडफेक सुरू झाली. यावेळी दंगल नियंत्रण पथकावर देखील दगडफेक करण्यात आली यादरम्यान पोटाला मार लागल्याने जखमी झालेले पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी हे एका बाकड्यावर बसले होते. मात्र वाढता जमाव बघता ते हातात फायबरची संरक्षक ढाल व एका हातात काठी घेत थेट जमावात शिरले त्यामुळे उपस्थित असलेले पोलीस देखील त्यांच्या मागे धावले. यावेळी सौम्य लाठीमार करण्यात आला त्यावेळी जमाव पांगण्यास सुरुवात झाली. तर दुसरीकडे जमावाला पांगवताना पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या कानावर दगड लागला त्यामुळे मोठा रक्तस्राव झाला तरी देखील ते जमावाला शांत करण्यात व्यस्त होते. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडत थेट पोलीस जमावत घुसल्याने जमावावर नियंत्रण मिळवता आले. त्याचबरोबर वझरे चौक सारडा सर्कल, गंजमाळ, बागवानपुरा येथे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केल्याने इथून जमाव बाहेर पडू शकला नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्याचबरोबर रात्री संपूर्ण जुन्या नाशकात पोलिसांनी खडा पहारा दिल्याने मोठा अनर्थ टळला. आज सकाळी पोलिसांनी रूट मार्च करत नागरिकांच्या मनातील भीती काढली. त्यामुळे आज जुन्या नाशिक परिसरातील जनजीवन पूर्वपदावर आल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळाले. पोलिसांनी माहिती घेत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, तसेच कायदा सुव्यवस्थेला आवाहन देणाऱ्यांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत पंधरा ते वीस जणांना अटक केल्याची माहिती मिळते आहे.त्याच बरोबर दोन्ही गटातील दंगलखोरांचा शोध सुरू आहे. दगडफेकीत पाच पोलीस अधिकारी व नऊ कर्मचारी जखमी झाली असून सर्वांची प्रकृती ठिक आहे. या सर्वांची भेट पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली असून पोलिसांनी अतिशय संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळल्याचे पालकमंत्री दादा भुसे म्हणाले.पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात असून दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे पोलीस आयुक्तांचा इशारा धुडगूस घालणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. याबाबत तपास सुरू असून जे सहभागी असतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात असून शांतता प्रस्थापित झाली आहे. कोणी अफवा पसरू नये व नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.


![]()














