गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 12 लाख कोटींची वाढ

नाशिक :काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत शेअर बाजाराविषयी भविष्यवाणी केली होती. मोदी म्हणाले की लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून 2024 रोजी येतील. या निकालानंतर भारतीय शेअर बाजारातील जुने विक्रम मोडले जातील. निवडणूक निकालानंतर संपूर्ण आठवडाभर जबरदस्त ट्रेडीग होईल. मात्र ही भविष्यवाणी एक दिवसांपूर्वी म्हणजेच आज 3 जून रोजीच खरी ठरली. याला कारण म्हणजे सर्व एक्झिटपोल, या सर्व एक्झिटपोलने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे आर्थिक स्थिरतेचे संकेत शेअर बाजाराला आवडले आणि बाजारात व्यवहार वाढले. मुख्य म्हणजे केंद्रीय पातळीवरील आर्थिक धोरणे पुढे सुरू राहतील.यामुळेच शेअर बाजाराला एक्झिटपोलचा बूस्टर डोस मिळाल्याचं दिसून येते. आज शेअर बाजारात मोठी उसळी बघायला मिळाली. सेन्सेक्स 2621 अंकाच्या जोरदार वाढीसह 76583 च्या पातळीवर उघडला. सेन्सेक्समधील सर्वच शेअर्स आज ग्रीन झोन मध्ये होते . आज अगदी बँक निफ्टी, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशाकांनीही आज नवीन उंचीला स्पर्श केला .या तेजाने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 12 लाख कोटींची वाढ झाली. एक्झिटपोल किती खरे ठरतील,भाजपा व मित्र पक्ष पुन्हा सत्तेत येतील का त्यावर शेअर बाजार हीच तेजी दाखवणार का हे उद्या म्हणजेच 4 जूनला स्पष्ट होईल.

![]()














