१५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारी २०२६ रोजी होणार मतमोजणी

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या घोषणेकडे सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते. अखेर आयोगाने निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आणि आता राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मुंबई, नाशिक ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ जानेवारीला सर्व महापालिकांसांठी मतदान पार पडणार आहे, तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील २९ महानगरपालिका क्षेत्रात आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याचीही माहिती देण्यात आली.राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.दुबार मतदारांच्या नावासमोर स्टार चिन्ह
मुंबईत 11 लाख संभाव्य दुबार मतदार आहेत. एकूण मतदारांचा विचार करता ती सात टक्के इतकी असल्याचं समोर आलं आहे. या दुबार मतदारांची ओळख केली असून त्यांच्या नावासमोर दोन स्टार असतील. त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे आणि मतदान कुठे करणार हे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे. ज्यांचा सर्व्हे झाला नाही त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेतल जाईल. कसा असेल निवडणूक कार्यक्रम ?
-नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी – २३ ते ३० डिसेंबर
-नामनिर्देशन पत्र छाननी – ३१ डिसेंबर २०२५
-उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत – २ जानेवारी २०२६
-निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी २०२६
-मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडेल.
-निवडणूक निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी लागेल.

![]()















