स्थानिक पातळीवर होणार ठाकरे गट व मनसे नेत्यांची बैठक

नाशिक : महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आणि महायुती पासून तर महाआघाडी पर्यंत सर्वच कामाला लागले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ठ म्हणजे यावेळी एकमेकांचे विरोधक असलेले ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार आहे. हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यासंदर्भात मनसेचे मुबंईहुन पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होणार असल्याचे समजते. दरम्यान मनसे नेते डॉ प्रदीप पवार, दिनकर पाटील, सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी गुरुवारी मुबंईत जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आणि नाशिकमधील राजकीय परिस्थितीची माहिती दिल्याचे समजते. त्याचबरोबर ठाकरे गटाची शिवसेना व मनसे एकत्र आल्यास पक्षाला मोठे यश मिळू शकते असे देखील राज ठाकरे यांना सांगण्यात आले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांना संजय राऊत यांच्याबरोबर चर्चा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार सर्व पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जागा वाटपाबाबत चर्चा करावी असे ठरले. सुरवातीला मनसे नेत्यांनी पुढाकार घेऊन मनसे, ठाकरे गट, शरद पवार राष्ट्रवादी गट, कॉग्रेस यांनी एकत्र येत आघाडी करण्याचे ठरले होते यामध्ये माकप व इतर पक्ष देखील होते मात्र कॉग्रेसने ऐनवेळी घुमजाव करत मनसे असेपर्यंत आम्ही एकत्र येऊ शकत नसल्याचे सांगितले होते.

![]()















