इच्छुकांची वाढती संख्या बघता भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता

नाशिक : तब्बल साडेतीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीच्या विळख्यात असलेल्या नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आणि इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली आहे. त्यामध्ये महायुतीकडे इच्छुक उमेदवारांची रांग लागल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात भाजपकडे इच्छुकांचा कल मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास प्रत्येक प्रभागात चार जणांच्या प्रभागासाठी 30 ते 40 अर्ज येत असल्याने भाजपच्या इतिहासातील विक्रमी संख्या मानली जात आहे. त्यात नाशिक महानगरपालिकेसाठी भाजपने 100 प्लस चा नारा दिला आहे. मग शिंदे गटाच्या शिवसेनेला आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्यामुळे भाजप कितीही सांगत असले महायुतीनेच लढणार तरी मात्र भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल अशी शक्यता आहे. मुख्य म्हणजे भाजपइतके या दोन्ही पक्षांकडे संघटन अथवा तितकी ताकद नाही.त्याचबरोबर भाजपकडे मोठ्या प्रमाणात भरणा झाल्याने युती झाल्यास भाजपकडे कमी जागा आल्यास मोठ्याप्रमाणात बंडखोरी होण्याची भीती भाजपला असून हेच बंडखोर महाआघाडीत देखील जाऊ शकतात. त्याचबरोबर भाजप, शिंदे गट, अजित पवार गट यांची युती झाल्यास अनेक प्रभागात जागावाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो. महायुती न झाल्यास भाजपकडून तिकीट नाकारल्या गेलेल्या उमेदवारांची पहिली पसंती शिंदे गटाची शिवसेना तर दुसरी पसंती अजित पवार गटाची राष्ट्रवादी असू शकते यामुळे हे बळ महाआघाडीला न मिळता महायुतीलाच मिळेल आणि भविष्यात पुन्हा युती होऊन महापौर महायुतीचा होऊ शकतो अशी चाल भाजप खेळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. नाशिक महानगरपालिकेतील 2017 चे पक्षीय बलाबल पाहिले तर भाजप 66,शिवसेना 35, राष्ट्रवादी 6 असे आहे युती झाल्यास 100 प्लस जागा भाजपने लढवल्यास शिंदे गट फक्त 22 जागा व यातून देखील अजित पवार गटाला काही जागा सोडल्यास शिंदे गटाची शिवसेना इतक्या कमी जागा लढवण्यास तयार होईल का हे देखील महत्वाचे आहे त्यामुळेच भाजपची सत्वपरीक्षा पाहणारी ही निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याची दाट शक्यता आहे.

![]()















