मनपा कारवाईविरोधात तीनही आखड्यांचे प्रमुख महंत एकत्र

नाशिक : शहरात तपोवनातील 1800 वृक्षतोडीचा वाद पेटलेला असताना आता तिन्ही वैष्णव आखड्यांचे महंत आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. नासिक सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने विविध कामकाज सुरू करण्यात आले आहे. यादरम्यान मनपाकडून तपोवनातील मठ मंदिरांना आरक्षणासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यामध्ये तपोवनातील लक्ष्मी नारायण बडा मंदिरासह, श्री साक्षी गोपाळ मंदिर, श्री शुपर्णखा मंदिर, श्री पर्णकुटी तसेच वृद्धाश्रमातील श्रीराम मंदिर आदींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसांना मठ मंदिरांकडून लिखित स्वरूपात आक्षेप नोंदवत प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सिहस्थाचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या लक्ष्मीनारायण बडा मंदिर ट्रस्ट चे महंत रामस्नेहिदास महाराजांनी दिगंबर अनी आखाड्याचे महामंत्री श्री महंत बलरामदास महाराज यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला त्यांनी तपोवनातील मठ मंदिरांना आलेल्या नोटिसांबाबत तसेच सिंहस्थमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. यावर श्री बलरामदासजी महाराज यांनी सांगितले की या विषयावर तीनही आखाड्यांचे प्रमुख महंत चर्चा करणार आहेत त्यानंतर नाशिकला येऊन प्रशासनासमवेत बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल. यासंदर्भात अखिल भारतीय सश्री पंच निर्मोही अनी आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज महंत रामजीदास, महंत नरेंद्रदास, श्री महंत महेशदास तसेच अखिल भारतीय श्री पंचनिर्वाणी अनी आखाड्याचे महंत मुरलीदासजी, महंत मोहनदास जी, महंत सत्य देवदासजी, महंत प्रेमदास महाराज आणि अखिल भारतीय श्री पंच दिगंबर आणि आखाड्याचे महंत वैष्णोदासजी, महंत माधवदास मौनीजी, महंत बलरामदास, महंत जानकीदास यांनी या प्रश्नांवर एकत्रित भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी काही प्रमुख महंत लवकरच नाशिक येथे येणार असून प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांबाबत मार्ग काढून चर्चा करणार आहेत. सिहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरा साधू संतांचे हक्क आणि पर्यावरण संवर्धन या बाबी लक्षात घेऊन निर्णय घेतले जावेत, अशी ठाम भूमिका आखड्यांकडून मांडण्यात येणार आहेत.

![]()















