मध्यच्या आ. देवयानी फरांदे यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती

नाशिक : आगामी महानगरपालिका निवडणुकाची रणधुमाळी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक भाजपमध्ये मोठी संघटनात्मक उलथापालथ झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी धक्कातंत्राचा अवलंब करत नाशिकच्या निवडणूक प्रमुखपदावरून आमदार ॲड. राहुल ढिकले यांना अवघ्या महिनाभरातच हटवले आहे. त्यांच्या जागी आता आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे पक्ष कार्यकर्ते अचंभित झाले आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुका 15 जानेवारीला असून त्यासाठी भाजपच्या कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. यंदा प्रथमच भाजपचे आमदार ढिकले यांना निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. यादरम्यान एक हजार कार्यकर्त्यांनी मुलाखती देखील दिल्या असताना बुधवारी अचानक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी तातडीने आदेश जारी करत ढिकले यांना बाजूला करत नाशिकच्या मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे निवडणूक जबाबदारी दिली या घोषणेने सर्वानाच धक्का बसला. राहुल ढिकले यांचे ते भाषण व्हायरल एका कार्यक्रमातील राहुल ढिकले यांचे भाषण सध्या व्हायरल झाले आहे. त्यात ढिकले म्हणाले आहेत की, विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एकाने माझी रॅली आडवली. त्याला माहित नव्हतं की देव कुठे तरी असतो. मला निवडणुकीत त्रास दिला. माझ्यावर टीका केली. मी शत्रूला देखील माफ करणारा माणूस आहे. राजकारण राजकारण्याच्या ठिकाणी, पण व्यक्तिगत त्रास दिलेला सहन करणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं.ढिकले पुढे म्हणाले, आता मी निवडणूक प्रमुख आहे. नाशिक महापालिकेत सगळे १२२ उमेदवार आहेत. सर्व प्रभागात मी हस्तक्षेप करणार नाही, मात्र मी पहिलवान आहे. ज्यांनी विरोध केला, ज्यांनी मला त्रास दिला त्यांना सोडणार नाही. त्यांना आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ढिकले यांनी दिला. ‘टप्प्यात येऊ द्या, नाही खाट मारली तर तालमीतला राहुल ढिकले नाही.अर्थात ढिकले यांनी स्पष्टपणे कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा सगळा रोख त्याच्याच पक्षातील म्हणजे भाजपमधील गणेश गिते यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.आणि त्याचेच निमित्त करून ढिकले यांच्यावर गंडांतर आणल्याची जोरदार चर्चा आहे.

![]()















