मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून

नाशिक : निवडणुकांचे बिगुल वाजले आणि महायुतीमध्ये चर्चा सुरू झाल्या, तर ठाकरे बंधूंची युती झाल्यात जमा असून घोषणा कधी होणार याकडे ठाकरे गटाची शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. मुख्य म्हणजे मुंबई मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याआधीच नाशकात महाआघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणूका एकत्रित लढवण्याची घोषणा केली होती. यानंतर मात्र नाट्यमय घडामोडी होत या आघाडीत मनसे असेल तर काँग्रेस नसेल अशी घोषणा करत पत्रकार परिषदेबरोबर आमचा संबंध नसल्याचे कॉग्रेसच्या मुबंई येथील नेत्यांकडून सांगण्यात आले होते.त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी नाशिक महानगरपालिकेत मनसे-शिवसेना युतीची घोषणा केली होती. त्यामुळे नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांना बळ आले आहे. 2017 च्या निवडणुकीत शिवसेना 35 आणि मनसे 5 असे पक्षीय बलाबल होते. मात्र शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडे 5 जागा उरल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर जागा वाटपाची चर्चा सुरू झाली असून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला देखील जागा सोडाव्या लागणार आहेत. तर स्थानिक पातळीवर कॉग्रेस ठाकरे बंधूच्या बरोबर निवडणुकीत उतरणार अथवा फक्त ठाकरे बंधुचं एकत्रित निवडणूक लढवणार किंवा कॉग्रेस व शरद पवार गटाची युती होणार हे येत्या काही दिवसात कळेलच मात्र ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेकडे नेते व कार्यकर्त्याचे लक्ष लागून आहे.

![]()















