डावपेचात कोण होणार यशस्वी, ते कळणार सोमवारी

लोकसभेची ही निवडणूक महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील, या लोकसभेच्या निवडणुकीत “नाशिक” हे नाव जोरदार चर्चेत राहिले ते महायुतीमुळे अगदी सुरवातीपासून असलेले हेमंत गोडसे यांना अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली गेल्याने जर हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी जाहीर करायची होती. तर दोन महिने गोडसेना झुलवत ठेऊन इतरांची नावे पुढे का आणली गेली हे अजूनही न उमजणारे कोडे आहे, कारण आता महायुतीचे शिवधनुष्य मतदारांपर्यंत अगदी कमी वेळात पोहचवण्याचे काम गोडसे यांच्याबरोबर पदाधिकारी, कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. उमेदवारीचा घोळ मिटल्यानंतर महायुती व महाआघाडी समोर आव्हान उभे आहे ते बंडखोरांचे आता या बंडखोरांना थंड कसे करावे या कामाला महायुती महाआघाडीचे सर्वच नेते लागणार आहेत. आणि त्यानंतर खरी लढाई कोणामध्ये होणार हे कळू शकेल. ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांच्यासमोर त्यांच्याच पक्षाचे शिलेदार विजय करंजकर यांचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. विजय करंजकर म्हणतात 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे 14 वर्ष जिल्हाप्रमुखपद उपभोगताना पक्षाला ग्रामपंचायत ते खासदार या सर्व निवडणुकांमध्ये विजयी केले मात्र मला शब्द देऊनही नाशिक स्थित काही जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांना चुकीची माहिती देऊन कान भरले.उमेदवारीसाठी इच्छुक नव्हते त्यांना उमेदवारी देऊन माझी उमेदवारी रद्द केली. त्यामुळे मी आता लढणार आणि नडणार ! असा इशाराच त्यांनी ठाकरे गटाला दिला यादरम्यान कार्यकर्त्यांकडून “सलीम कुत्ताला” सोडू नका अशा घोषणा देण्यात आल्याने विजय करंजकर यांचा रोख व राग ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्या विषयी असल्याचे स्पष्ट दिसत होते . यादरम्यान विजय करंजकर यांना उद्धव ठाकरे यांनी दोनदा बोलावले असल्याचे समजते. मात्र करंजकर यांनी त्याकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. आता विजय करंजकर काय भूमिका घेतात ते अपक्ष उभे राहतात की माघार घेतात ते सोमवारी कळेल मात्र करंजकर अपक्ष उभे राहिल्यास महाआघाडीची म्हणजेच ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार हे तितकेच महत्वाचे आहे. तर दुसरीकडे महाआघाडीची डोकेदुखी वाढवणार ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर हे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना तब्बल 1 लाख 9 हजार मते पडली होती. यामुळे तत्कालीन राष्ट्रवादी कॉग्रेसचे समीर भुजबळ यांना त्याचा फटका बसल्याची चर्चा होती . यावेळी वंचित बहुजन आघाडीने मराठा कार्ड खेळत करण गायकर यांना उमेदवारी दिली. वंचितच्या या कार्डने महाआघाडीचा खेळ बिघडण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहे. आता महायुती म्हणजेच शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान ते शांतीगिरी महाराजांचे हा फटका हिंदुत्व म्हणून बसण्याची शक्यता दिसते, नाशिक लोकसभा मतदारसंघात महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे आपण देव,देश,धर्म यासाठी निवडणूक लढवत असल्याचे शांतीगिरी महाराज म्हणतात, आगामी होऊ घातलेल्या सिहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराजांची उमेदवारी महत्वपुर्ण समजली जात आहे महाराज म्हणतात आता माघार नाही लढणार आणि जिंकणार ,त्यामुळे ते माघार घेतली असे वाटत नाही मात्र याचा थेट फटका महायुतीला बसण्याची शक्यता राजकिय अभ्यासक व्यक्त करत आहेत. दुसरीकडे महायुतीच्या दृष्टीने भुजबळ नाशिकमध्ये महत्वाचे नेते ठरले आहेत. मग ते केंद्राकडून भुजबळ यांना निवडणूक लढवण्यासाठी आलेल्या सूचना असो अथवा चंद्रपूर मध्ये भाजपा उमेदवाराचा प्रचार,त्याचबरोबर महायुतीचा लोकसभा उमेदवार घोषित करण्यापूर्वी भाजपा नेतृत्वाने भुजबळ फार्म वर जाऊन केलेली चर्चा व भेट यामधून एक सिद्ध होते की नाशिक जिल्ह्याचा निर्णय घेताना भुजबळ यांना विश्वासात घ्यावेच लागेल यामुळे छगन भुजबळ हे महायुतीचा म्हणजेच हेमंत गोडसे प्रचार मनापासून करणारच.अर्थात त्यांना केंद्राला देखील उत्तर द्यावे लागेल. यामुळे मोदींना केंद्रस्थानी ठेवत भुजबळ यांना प्रचार करावाच लागणार आहे. आणि ते म्हणाले सुद्धा ज्यांना तिकीट मिळेल त्यांचा मनापासून प्रचार करणार. या बंडखोरीत अजून एक नाव येत आहे ते म्हणजे भाजपाचे अनिल जाधव यांच, त्यांचा संबंध दिल्लीत कुठल्यातरी नेत्याबरोबर येत असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे ते ऐनवेळी तलवार म्यान करण्याची शक्यता आहे आणि भाजपा तसा प्रयत्न करेलच .या बंडखोरीत अजून एक नाव समोर येत आहे ते म्हणजे अजित पवार गटाचे निवृत्ती अरिंगळे ,राष्ट्रवादीने प्रयत्न केल्यास अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आल्यास ते माघार घेण्याची शक्यता वाटते कारण ते अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात. माजी महापौर दशरथ पाटील यांनी आधीच माघार घेतली आहे .मुख्य म्हणजे बंडखोरीला अनेक किनार असतात एकतर आपले उपद्रव मूल्य दाखवून पुढचा शब्द सोडवून घेणे अथवा कोणालातरी शह देण्यासाठी आपले जाळे टाकणे त्याचबरोबर विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राजकारणात या गोष्टी घडणारच आता महायुती व महाआघाडी या बंडखोरांना कसे शांत करणार हे सोमवारी कळेलच मात्र नाशिक लोकसभेत मुख्य लढत ही ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे व शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्यात म्हणजेच शिवसेना विरोधात शिवसेना अशीच होणार .

![]()














