मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश तर मंत्री छगन भुजबळ संतप्त

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. काही गाव-गुडांनी पत्रकारांना बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात तीन ते चार पत्रकारांवर हल्ला केल्यानं ते गंभीर जखमी झाले असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर गंभीर हल्ला करण्यात आल्याने पत्रकार संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर येथे साधुमहंतांची बैठक असल्याने त्यासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी नाशिकहून इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिनीचे पत्रकार त्रंबकेश्वर येथे वाहनाने जात असताना स्वामी समर्थ केंद्राजवळ त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नावाने करवसुली करणाऱ्या तरुणांनी पत्रकारांचे वाहन अडवले यावेळी पत्रकारांनी आम्ही वृत्तसंकलनासाठी आलो आहोत तरी वाहन घेऊन जाऊ दयावे असे वारंवार सांगत असताना देखील त्या तरुणांनी आपला उद्धटपणा कायम ठेवला. बोलत असताना अचानक अरेरावी करणाऱ्या तरुणांनी घोळका करत पत्रकारांवर दगड, काठ्या आणि छत्रीने हल्ला करत मारहाण सुरू केली या बेदम मारहाणीत पत्रकार योगेश खरे,अभिजित सोनवणे,किरण ताजने जखमी झाले. अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल— या झालेल्या मारहाणीत पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दोघे जण जखमी असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. वसुलीसाठी गुंडांचा वापर—- त्र्यंबकेश्वरमध्ये जेव्हा पर्यटक येतात तेव्हा त्यांच्याकडून प्रवेश कर वसूल केला जातो. यासाठी काही गुंड प्रवृत्तीची मुलं तिथं तैनात केली जातात आणि या मुलांनीच त्यांच्यासह तिथं असणाऱ्या पत्रकारांना मारहाण केली. या वसुली करणाऱ्या तरुणांच्या अरेरावीच्या अनेक तक्रारी पर्यटक व नाशिक जिल्ह्यातील नागरिकांच्या असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना — घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि या प्रकरणात दोषींना ताब्यात घेण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मंत्री छगन भुजबळांचा संताप— मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला. पत्रकारांना अशी वागणूक तर पर्यटकांना काय वागणूक देणार? असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे. त्यांनी सांगितले की, ‘त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा. अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे. त्याठिकाणचे पोलिस काय करत आहे. त्यांना माहिती नाही का ही लोकं कोण आहेत? मीडियाची लोकं एकत्र होती म्हणून ही घटना बाहेर आली. जर एखादा एकटा व्यक्ती असेल तर त्याच्यासोबत काय होईल. या घटनेची चौकशी झाली पाहिजे.पत्रकारांना त्रास होणार नाही. मी पोलिस आणि यंत्रणांशी बोलतो. पुन्हा अशा घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी. दादागिरी आणि मारामारी काय कामाची आहे. तुमच्या त्र्यंबकेश्वर गावाचे महत्व वाढवण्याचे काम मीडिया करत आहे. असं जर असेल तर कसं होईल. पोलिसांनी करावाई करावी. मनात आणले तर पोलिस कारवाई करू शकतात. या गावगुंडाचे पोलिस रेकॉर्ड तपासा. ज्यांनी त्यांना ही अथोरिटी दिली त्यांनाच जाब विचारावा लागेल की कुठल्या प्रकारची माणसं तुम्ही नेमली आहेत. पत्रकारांसोबत असे जर वागत असाल तर जगभरातील लोक येतात त्यांना काय वागणूक देणार. या प्रकरणात पूर्णपणे न्याय देऊ.असेही भुजबळ म्हणाले. त्या गुंडांचा बंदोबस्त करा— राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करणे ही काळाची गरज असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे ही राज्य सरकार आणि गृहखात्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असून सरकारने तातडीने हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु
घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणाचा पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पत्रकारांवरील हल्ल्याचा सा क्राईम स्पेशल टाइम्स व black and white न्यूज चे संपादक महेश गिरमे यांनी निषेध केला असून ज्या ठिकाणी पत्रकार सुरक्षित नाही त्या ठिकाणी सामान्य नागरिकांचे काय ? या घटनेतील गाव -गुंडांना कठोर शासन करावे जेणेकरून पत्रकारांना घडणाऱ्या रोजच्या बातम्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे सोप्पे जाईल व पुन्हा कोणी अशी हिम्मत करणार नाही अशी मागणी देखील महेश गिरमे यांनी केली.

![]()















