धक्कादायक घटनेच्या व्हायरल व्हिडीओने हादरले नाशिक

नाशिक : शहरात भरदिवसा एका तरुणाचा अपहरण करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या धक्कादायक घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरून गेले. नेमकं घडलं तरी काय ? या विचारानेच आज नाशिककरांचा जीव टांगणीला लागलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सातपूर पोलिस ठाणे हद्दीतील त्र्यंबक रोड म्हणजेच पपया नर्सरी परिसरात घडली असून तरुणीसोबत असलेल्या जुन्या प्रेमप्रकरणातून पूर्वीच्या प्रियकराने व त्याच्या साथीदारांनी मिळून सदर महिलेच्या पतीचे अपहरण करत त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज म्हणजेच 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास तेजस ज्ञानेश्वर घाडगे(वय 24) हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या एका चहाच्या टपरीवर आला होता.मुख्य म्हणजे तेजस घाडगे याचे काही दिवसांपूर्वी मधुमती नावाच्या तरुणीबरोबर लग्न झाले होते. तेजस हा ड्रायव्हर म्हणून काम करतो.मुख्य म्हणजे तेजसच्या पत्नीचे लग्नापूर्वी गिरीश शिंगोटे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. यातूनच लग्नाच्या काही दिवसानंतर गिरीश शिंगोटे हा तेजस याला धमक्या देत होता.याप्रकरणातूनच संशयित प्रियकर गिरीश शिंगोटे याचा मित्र शैलेश कुवर ऊर्फ बंटी ,अक्षय पवार व त्याचे 4 ते 5 मित्र यांनी तेजस घाडगे यांना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीत नेऊन त्या गाडीत अपहरण करण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली.नंतर संशयितांनी कार सातपूर कॉलनीच्या दिशेने नेली.यावेळी तेजस याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला मात्र काही अंतरावर कारचा वेग कमी झाला असता घाबरलेल्या तेजसने प्रसंगावधान राखत कारमधून उडी घेतली.त्यानंतर त्याने सरळ रिक्षातून पपया नर्सरी येथील वाहतूक पोलीस ठाणे गाठले. तेजस पोलिस चौकीत गेल्याचे लक्षात येताच अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढल्याची माहिती तेजस यांनी दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे. संशयित गिरीश शिंगोटे यानेच त्याच्या मित्रांसमवेत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची तक्रार तेजस घाडगे यांनी सातपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान संशयितांना शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून संशयितांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र भरदिवसा तरुणाचे अपहरण करत संशयितांनी एकप्रकारे कायद्यालाच ठेंगा दाखवला आहे. सध्या शहरात वाढलेली गुन्हेगारीची चर्चा संपुर्ण शहरात सुरू आहे. त्यामुळे नाशिक सिटी भविष्यात क्राईम सिटी म्हणून ओळखली जाते का ? हीच भीती सामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत.

![]()












