हा आमचा भाग, याठिकाणी आम्हीच भाई, हप्तावसुली वरून वाद टोकाला

नाशिक : शहरातील गुन्हेगारी वाढली असून आधी खुनाचे सत्र सुरू असतानाच आता वर्चस्ववाद आणि हप्तावसुली साठी टोळ्या एकमेकांवर चाल करून जाण्याच्या धक्कादायक घटना घडू लागल्या आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.मुख्य म्हणजे हे सर्व सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे. जयभवानी रोडवरील फर्नांडिसवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हप्तावसुली आणि वर्चस्ववादातून रोहित डिंगम व राहुल उज्जैनवाला या टोळ्यांमध्ये भडका उडाला आणि या टोळक्याने सर्रासपणे लाकडी दांडके, धारधार शस्त्रे याचा वापर करत टोळक्याने अगदी सिनेस्टाईल पद्धतीने एकमेकांवर गावठी कट्यातून 10 ते 15 गोळ्यांच्या फैरी झाडल्याची कुजबूज परिसरात सुरू आहे. त्याचबरोबर रोहित डिंगमच्या साथीदारानी राहुल उज्जैन वाल्याची काकू असलेल्या वकील जसलीन यांच्या घरावर दगड व बिअरच्या बाटल्या फेकत संशयित पसार झाले. राहुल उज्जैनवाला याचे खटले न्यायालयात त्या चालवत असल्यामुळे त्यांनी हाच राग धरत घरावर दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे.यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघा संशयितांना ताब्यात घेतले त्याचबरोबर गोळीबाराच्या घटनेत वापरलेली कार व दोन देशी पिस्तुलानंबरोबर संशयित इरशाद मोहम्मद अली चौधरी (29,रा देवळाली गाव) यास 12 तासात गुंडाविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून 3 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फायर केलेल्या काडतुसाचा एक तुकडाही त्याच्या कारमध्ये मिळून आला.या घटनेनंतर जय भवानी रोड परिसरात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. मुख्य म्हणजे हा भाग आपला असून या भागात यायचे नाही या ठिकाणचे भाई आपणच आहोत, याठिकाणी हप्तावसुली आपले साथीदार करणार यावरून डिंगम आणि उज्जैनवाला यांच्यात बाचाबाची झाली होती. ते सराईत गुन्हेगारच ? यापूर्वी देखील सराईत गुन्हेगार असलेल्या रोहित डिंगम वर खून, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गंभीर दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहेत..2023 साली सिडकोतील पवननगर परिसरात एका माजी नगरसेवकाच्या दिशेने गावठी कट्यातून गोळ्या झाडल्यानंतर पसार झालेल्या डिंगमचा दीड किलोमीटर पर्यंत पोलिसांनी पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. गुन्हा दाखल….संशयित रोहित डिंगम, उर्फ माले,सनी उर्फ टक्या पगारे,, श्रीकांत उर्फ बारक्या वाकोडे, सुशांत नाटे, राहुल उज्जैनवाला यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता काही महिन्यांवर महानगरपालिका निवडणुका येऊन ठेपल्या असून सिहस्थ कुंभमेळा देखील तोंडावर असताना शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून कोयते, तलवारी आणि आता बंदुकांचा सर्रास वापर होऊ लागला आहे. यामध्ये शहरातील काही खून टोळी युद्धातून तर काही खून इतर कारणातून झाल्याने सामान्य नाशिककर आता असुरक्षित असून पोलिसांना आव्हान देणाऱ्या या भाईंच्या पोलिसांनी वेळीच नांग्या ठेचाव्यात तर राजकीय नेत्यांनी देखील आपल्या बॅनरवर फोटो असलेल्या गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्याची मागणी आता सामान्य नागरिक करू लागले आहेत.


![]()















