ताशी 15 किमी वादळी वारे

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शहराला जोरदार तडाखा दिला. अनेक भागात झाडे उन्मळून पडली. झाडांखाली दबून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले. रात्रीपासून बुधवारी दिवसभर अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. अचानकपणे सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग ताशी साधारणत 15 किमी इतका राहिल्याने अनेक ठिकानी झाडे कोसळली यामध्ये मोटारींचे देखील नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकरोड परिसरात 24 तर इंदिरानगर, सिडको अंबड परिसरात 20 झाडे कोसळली त्यामुळे शहर अंधारात होते. बुधवारी गोदाकाठी भरणाऱ्या बाजाराला देखील याचा मोठा फटका बसला. निफाड, चांदवड, सिन्नर, नांदगाव, येवला, मालेगाव, कळवण, बागलाण, देवळा, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मॉन्सूनपूर्व पाऊस आणि गारपिटीमुळे दाणादाण उडाली. प्रामुख्याने कांदा, आंबा, डाळिंब बागांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.अनेक ठिकाणी कांदा काढणी, साठवणूक तर कांदा बीजोत्पादन क्षेत्रात डेंगळे तोडणी सुरू होती; मात्र वादळी वारे, गारपिटीने नुकसान वाढले. साठवलेला चारा भिजला तर काही चारा वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यांत आंब्याला मोठा फटका बसला. तसेच मालेगाव, सटाणा व चांदवड तालुक्यांत डाळिंब बागांचे नुकसान झाले. शहरात आज गुरुवारी (दि 8) रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

![]()















