नाशिकच्या इंदिरानगर परिसरातून एक तरुण ताब्यात

नाशिक : बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी दि.०३ मे २०२६ रोजी नीट परीक्षाही घेण्यात आली. मात्र, या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे आता नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, या पेपर फुटीप्रकरणी राजस्थान पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील इंदिरानगर भागातून एकास ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची पहिली प्रत नाशिकमध्ये तयार करण्यात आली होती. हीच प्रत हरियाणाला पोहोचली,जिथे या फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचे १० संच तयार करण्यात आले. त्यानंतर ही फुटलेली प्रश्नपत्रिका हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश,जम्मू-काश्मीर आणि राजस्थान या राज्यांमध्ये पोहोचली. याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 30 वर्ष वयाचा खैरनार नामक व्यक्तीला ताब्यात घेतले असून तो बीएमएसचे शिक्षण घेत असल्याचे समजते. आतापर्यंत या प्रकरणी देशभरातील विविध ठिकाणाहून १६ संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे यात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या घोटाळ्याचे केंद्र नाशिक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिकमध्ये फुटलेली प्रश्नपत्रिका केवळ स्थानिक राहिली नाही तर हरियाणामार्गे देशभर पोहचली. या प्रकरणामुळे देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. देशातील एकूण २२ लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. यामधील अडीच लाख विद्यार्थी महाराष्ट्रातील होते.

![]()















