आपआपसातील भांडणात लागली भीषण आग

नाशिक : इंदिरानगर परिसरातील जॉगिंग ट्रॅक समोर (साईनाथ नगर चौफुली) असलेल्या “डी एम” या फर्निचर दुकानाला आग लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते मिळालेल्या माहितीनुसार आप-आपसातील भांडणातून दुकानाला आग लागल्याची चर्चा आहे. मात्र ही आग बाजूलाच असलेल्या चारचाकी गॅरेजलाही लागल्याने या आगीने रौद्र रूप धारण केल्याने मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे समजते. जॉगिंग ट्रॅक लगत मन्सूरी बंधूंचे डी एम फर्निचरचे दुकान असून याठिकाणी सोफा सेट बनवले जातात मात्र आज 4 वाजेच्या दरम्यान या दोघा भावांच्या मुलांमध्ये दुकानाच्या मालकी हक्कावरून मोठ्याप्रमाणात वाद झाला. यादरम्यान यातील एका तरुणाने जमिनीवर ज्वालाग्राही पदार्थ टाकत त्याला पेटवून दिले. अशी माहिती परिसरातील इतर व्यावसायिकांनी दिली. दुकानात फोम, कापड, कापूस, लाकूड, प्लास्टिक असे चटकन पेट घेणार सामान असल्याने काही कळण्याच्या आत दुकानातील सर्व सामान आगीच्या विळख्यात सापडले. यादरम्यान शेजारीच असलेले चारचाकी वाहनांचे न्यू डीलक्स गॅरेज देखील आगीच्या चपाट्यात आल्याने आगीने रौद्र रूप धारण केले यामुळे आग पसरली.यावेळी शेजारील गॅरेजमधे असलेल्या गाड्या बाहेर रस्त्यावर आणण्याचे काम तेथील कामगारांनी युध्दपातळीवर केले. गॅरेजमधे त्यावेळी सहा गाड्या होत्या. दोन गाड्या आगीच्या विळख्यात सापडल्या. दरम्यान, आगीची माहिती मुख्य अग्निशमन विभागाला देण्यात आली. मुख्य अग्निशमन बंबासह अन्य ठिकाणाहूनही बंब मागवण्यात आले. पाच ते सहा बंबांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आग विझवली. फर्निचरचे दुकान आणि गॅरेजचे आगीत मोठे नुकसान झाले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने अग्निशमन विभागाचे कर्मचारी, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांना गर्दी हटविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. जॉगिंग ट्रॅककडील रस्ता काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सायंकाळी उशीरापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. मुख्य म्हणजे या परिसरातील दुकानदारांनी केलेले अतिक्रमण चर्चेत असून काल आमदार देवयानी फरांदे यांनी बैठक घेत मनपा अधिकाऱ्यांना 18 दिवसात अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या होत्या. तर आज दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी साईनाथ नगर येथील सिग्नल जवळ असलेल्या चौफुलीवर थांबत परिसराची पाहणी करत अधिकाऱ्यांबरोबर चर्चा देखील केली असतानाच काही तासाच्या अंतरावर याठिकाणी भीषण आग लागल्याने पुन्हा एकदा अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आला असून तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात इंदिरानगर व नाशिक शहरातील अतिक्रमण मोठ्याप्रमाणात काढले गेले होते. आता मनपा आयुक्त मनीषा खत्री यावर काय पाऊल उचलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

![]()















