गोविंदनगर परीसरात खाऊगल्लीचे वाढते अतिक्रमण, नागरिकांचा संताप

नाशिक : काल रविवारी दुपारच्या सुमारास इंदिरानगर बोगद्याकडून गोविंदनगर जाणाऱ्या रस्त्यावर सुसाट कारने पादचारी रस्त्यावर उभ्या असलेल्या शिक्षिका गायत्री संदीप ठाकूर (38 रा .इंदिरानगर) यांना धडक देत गंभीर जखमी केल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एक महिला व एक विक्रेताही जखमी झाल्याचे समजते . मिळालेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील रहिवासी असलेला संशयित सौरभ सुनील भोपे त्याच्या कारमधून (एमएच 14 जेई 0900) मैत्रिणीला घेऊन मुंबईहुन नाशिकला आला होता. गोविंदनगर परिसरातून मोबाईल बघत वेगाने जात असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. सुसाट कार थेट रस्त्यालगत उभ्या असलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या वाहनांना धडकत पुढे गेली. यावेळी उसाचा रस पिण्यासाठी उसाच्या गुऱ्हाजवळ थांबलेल्या गायत्री ठाकूर या कारच्या चाकाखाली सापडल्या तर त्यांच्यासोबत असलेल्या दोघी मैत्रिणींना कारची धडक बसली तर ऊस रस विक्रेत्याने बाजूला धाव घेतल्याने तो थोडक्यात बचावला. या अपघातामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले यावेळी उपचार सुरू असताना गायत्री ठाकूर यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले त्याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अतिक्रमणामुळे नागरिकांचा संताप —- गोविंद नगर परिसरात पादचारी रस्त्यावर दुतर्फा मोठ्याप्रमाणात अतिक्रमण वाढत असल्यानेच अपघात घडत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मनीष जयकर म्हणतात. त्याचबरोबर या अतिक्रमणाला महापालिकेचा आशीर्वाद असून या मध्ये अर्थ कारण असल्यानेच अतिक्रमण करणारे घाबरत नसून गोविंदनगरच्या रस्ताला आता खाऊगल्लीचे स्वरूप आले असून याठिकाणी कुठली जत्रा भरली का ? असा भास देखील होतो. अनेकदा महापालिकेला कळून देखील तात्पुरती कारवाई केली जाते त्यानंतर पुन्हा ही खाद्यपदार्थची दुकाने सुरू होतात. यापूर्वी देखील या परिसरात अपघात घडले असून महापालिकेचा अतिक्रमण विभाग कुणाचा जीव जाण्याची वाट बघतो का असा संतप्त सवाल देखील मनीष जयकर यांनी केला आहे.



![]()















