महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला खिंडार

नाशिक : शहरात दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का दिला यांदरम्यान सातपूर प्रभाग समितीचे सभापती योगेश शेवरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत मनसेला मोठा धक्का दिला असून हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मनसे पक्ष स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या सोबत असल्याने हा भाजप प्रवेश मनसेला नाशिक शहरात मोठा धक्का मानला जात आहे. सुरवातीच्या काळात 2008 साली मराठीच्या मुद्यावरुन राज ठाकरेंना अटक झाली, त्यावेळी नाशिकमध्ये मनसेची प्रचंड ताकद होती.2009 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले. त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून मनसेचे तीन आमदार निवडून आले होते.त्यांनतर नाशिक महापालिकेवर मनसेने एकहाती सत्ता आणत मनपावर झेंडा फडकवला होता. यादरम्यान मनसेचा पहिला महापौर देखील झाला होता त्यानंतर मात्र मोठ्याप्रमाणात गटबाजी होऊन पक्षातील महत्वाचे नेते वसंत गिते मनसे बाहेर पडले त्यानंतर मात्र मनसेला गळती लागली ती आजपर्यंत थांबलीच नाही. अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षातून जाणे पसंत केले. 2014 त्यानंतर 2019 या दोन विधानसभा निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. मनसेच्या उमेदवारांना मिळालेली मत पाहिले तर जनाधार किती मोठ्या प्रमाणात घटला आहे ते दिसून येते मागच्या काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी नाशिक दौरा करत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांसोबत वन टू वन चर्चा केली होती. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर देखील पक्षातील गळती सुरूच आहे.

आज भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मनसे प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे,,मनसे सरचिटणीस निखिल सरपोतदार, रोजगार स्वयंरोजगार प्रदेश उपाध्यक्ष मनोज जोशी,मनवीसे शहर उपाध्यक्ष रोहित कुलकर्णी,मनवीसे शहर उपाध्यक्ष प्रतीक राजपूत, विधी विभाग शहरअध्यक्ष सागर कडभाने,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घुगे, मंदार पिंगळे,किरण मोरे आदींनी भाजप मध्ये प्रवेश केला यावेळी आमदार देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.

![]()















