नांदगाव मतदारसंघात मोठा राजकीय निर्णय घेतला जाण्याची शक्यता

नाशिक : लोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले मात्र यावेळी दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, कॉग्रेस व भाजप निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे इच्छुक उमेदवार कधी कोणत्या पक्षात जातील हे सांगता येणे अवघड होऊन बसले आहे .वाढत्या इच्छुक उमेदवारांनामुळे महाविकास आघाडी व महायुतीची डोकेदुखी वाढतच चालली आहे . अश्यातच नांदगाव मतदारसंघ महायुतीची डोकेदुखी ठरू पाहत आहे त्याला कारण देखील तसे आहे नांदगाव मतदारसंघातुन शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना शह देण्यासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. नांदगाव मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी सलग दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी तयारी सुरू केली असतानाच भुजबळ कुटूंबियांकडून त्यांना आव्हान मिळत आहे. महायुती मध्ये ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला जागा सोडण्यात येणार असल्याचा ठराव झालेला असताना महायुतीचाच एक भाग असलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी या मतदारसंघात तयारी चालवल्याने महायुती मध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त “समीर-पंकज आता तुम्ही मोठे झाला आहात, तुमचे निर्णय स्वतः घ्यायला शिका असा सल्ला दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याठिकाणी महायुतीत ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला सुटल्यास समीर भुजबळ हे बंडखोरी करत हाती मशाल घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शिवसेनेत निवडून येऊन शिंदे गटाबरोबर जाणाऱ्या सुहास कांदेना शह देण्यासाठी ठाकरे गटाची शिवसेना याठिकाणी तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात असल्याचे समजते त्यामुळे या मतदारसंघात काहीतरी वेगळे होण्याचे संकेत असून आज मुंबई येथील अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर नांदगाव मतदार संघातील कार्यकर्त्यांनी ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी करत इतर कोणाचेही काम करणार नसल्याचा इशारा दिल्याचे समजते.

![]()











