सिंहस्थ निमित्ताने सुरू असलेली सर्व कामे ठरलेल्या वेळेत आणि गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश

नाशिक : (ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांची उच्चस्तरीय पाहणी केली गेली. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वर, नाशिकमधील गोदाघाट, द्वारकापथ आणि भुयारी मार्ग प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली.आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. या कामांमुळे दोन्ही शहरांचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ, गोदाघाट, नाशिकमधील द्वारका सर्कल आणि ओझर विमानतळावरील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. ही कामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून, पुढील 25 ते 30 वर्षांच्या विकासाचा पाया मजबूत करणारी ठरणार आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणांनी अधिक दक्ष राहून ही कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सध्या पूर्ण झालेले काम आणि सुरू असलेले कामाचा त्यांनी आढावा घेतला. द्वारका भुयारी मार्गाचे काम अतिशय आव्हानात्मक होते. तरीदेखील राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महापालिका, पालकमंत्री आणि इतर विविध संस्था यांच्या प्रयत्नांनी अतिशय उत्कृष्टरीत्या काम केले जात आहे. वाहतुकीची यातून मोठी समस्या सुटणार आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तसेच इतर घाटांचे कामही योग्यरीत्या सुरू आहे. संपूर्ण कामे वेळेत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सुरू असलेल्या कामांमुळे आगामी दिवसात त्र्यंबक आणि नाशिकचा संपूर्ण कायापालट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिकमधील द्वारका सर्कलचे काम वेगाने प्रगतीपथावर असून, यंदाच्या पावसाळ्यात तेथे पाण्याचा निचरा सुरळीत होण्याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. याशिवाय, ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आणि आगामी काळात येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, मोनिका राऊत उपस्थित होते.



![]()












