मुकेश शहाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नाशिक :अवघ्या सहा दिवसांवर लोकसभा निवडणुकीचे मतदान येऊन ठेपले आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारावर भर दिला असताना काल नाशिक पश्चिम मतदार संघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या शुभम पार्क येथील संपर्क कार्याजवळ पोहोचली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात मशाली घेऊन घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी प्रचार रॅलीवरून खाली उतरत थेट महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयात धाव घेत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश उघडे यांच्या हातातील मशाल खाली पडली आणि वातावरण चांगलेच तापले. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. मुकेश शहाणे यांनी इशारा देत पुढे आपल्या वाहनातून प्रचार रॅलीत सहभागी झाले. सदर घटना वाऱ्यासारखी शहरात पसरताच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या कानावर सदर प्रकाराचे कथन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तब्बल चार तासानंतर भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यावर निवडणुकीतील अधिकृत पक्ष चिन्हाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे नाशिक शहरात महाविकास आघाडी व महायुतीतील राजकीय वातावरण चांगले तापले असून
यावेळी रात्री उशिरा भाजप प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण ,माजी नगरसेवक मुकेश शहाणे आदींसह भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर अंबड पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तक्रार अर्ज देण्यास सांगितले व याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले.

![]()











