
इच्छुक उमेदवार अस्वस्थ,तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम
नाशिक :देशात लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी सुरळीत मतदान पार पडले. तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची घटना घडली. यावेळी अचानक पणे महायुतीचे उमेदवार म्हणून चर्चेत आलेले राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अचानकपणे माघार घेत असल्याचे जाहीर केले. यामुळे राजकीय तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मुख्य म्हणजे भुजबळ म्हणाले नाशिकच्या जागेबाबत तिढा निर्माण झाला असून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचारात पुढे निघून गेला आहे. आता अधिक विलंब होऊन महायुतीचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी आपण माघार घेत असल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले. भुजबळ यांनी माघार का घेतली ? याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.सुरवातीला चर्चेत नसणारे छगन भुजबळ हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवणार म्हणून चर्चेत आले आणि आज लोकसभेच्या निवडणुकांचा पहिला टप्पा संपता-संपता छगन भुजबळ यांनी अचानक माघार घेतल्याने नेमकं चाललं तरी काय अशीच चर्चा नाशिककरांमध्ये आहे. न्यूज ब्लँक अँड व्हाइट च्या मागच्या बातमीत सांगितल्या प्रमाणे भुजबळ यांच्या नावाचा गवगवा करायचा ,चाचपणी करायची अशी कुठली रणनीती भाजपाची होती का, याबाबत शंकेला वाव आहे. मात्र भुजबळांनी माघार घेऊन तीन दिवस उलटून गेले तरी उमेदवार जाहीर होत नसल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत चालली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास 26 एप्रिल पासून सुरवात होत असताना महायुतीचा उमेदवारच जाहीर होत नसल्याने इच्छुकांबरोबर शिंदे गटातील कार्यकर्ते सुद्धा प्रचार कुणाचा करावा,उमेदवार कोण असणार ? याबाबत चर्चा करत आहेत. दुसरीकडे लोकसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर ठाकरे गटाने शिवसेनेने सिन्नरचे मा.आ राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी घोषित करून प्रचारात आघाडी घेतली. शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत ठाकरे गटाचा उमेदवार पोहचत असताना शिंदे गटाचा उमेदवारच ठरत नसल्याने इच्छुक उमेदवारांबरोबर कार्यकर्ते देखील संभ्रम अवस्थेत आहेत. कधी रंगपंचमी, कधी गुढीपाडवा तर कधी रामनवमी असे मुहूर्त आले आणि गेले मात्र महायुतीचा म्हणजेच शिंदे गटाच्या शिवसेनेचा उमेदवार घोषित झाला नाही. शिंदे गटासाठी अडचणीचे ठरणारे छगन भुजबळ यांनी माघार घेतली .भुजबळ यांच्या माघारीमुळे तिढा सुटेल असे वाटत होते मात्र तीन दिवस उलटले तरी महायुतीच्या गोटात शांतता दिसत असल्याने इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले असून आता आणखी उशीर झाल्यास उमेदवारी स्वीकारायची की नाही याबाबत देखील इच्छुकांचा विचार चालल्याचे समजते. कारण नाशिक लोकसभा मतदार संघ मोठा असून शहराबरोबर ग्रामीण भाग देखील जोडला गेल्याने अवघ्या 28 दिवसात प्रचार तरी कसा करावा याचाच विचार इच्छुक उमेदवार करत असून यामुळे महायुती समोर अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे.

![]()











