नाशकात दादांच्या शिलेदारांची हतबलता

नाशिक : राजकारणात कोणी-कोणाचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा पडघम वाजला आणि महायुती करण्यासाठी सत्तेत असलेले मित्र पक्ष भाजप, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात नाशिक शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलणे सुरू आहे. यासाठी सोमवारी मंत्री गिरीश महाजन या हॉटेलमध्ये दाखल झाले. महाजन यांना भेटण्यासाठी तुफान गर्दी झाली. यामध्ये इच्छुक देखील मोठ्याप्रमाणात होते. मात्र यादरम्यान कोअर कमिटी आणि भाजपचे आमदार सोडून महाजन कोणालाच भेटले नाही. यावेळी आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ढिकले,बाळासाहेब सानप, गणेश गीते, सुधाकर बडगुजर आदींनी महाजन यांची भेट घेतली. यादरम्यान खासदार समीर भुजबळ त्याठिकाणी दाखल झाले यावेळी महाजन यांनी भेटीसाठी वेळ दिली नाही. या भेटीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर, नरहरी झिरवळ, नितीन पवार यांनी भेट होण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील गिरीश महाजन पुढील कार्यक्रमासाठी रवाना होण्यासाठी निघाले यावेळी आमदारांनी महाजन यांची भेट घेण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले मात्र गिरीश महाजन आपल्या वाहनात जाऊन बसले. यावेळी आमदार खोसकर, आणि झिरवाळ यांनी गाडीजवळ जात आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी थांबलो आहोत,पाच मिनिटे तरी आम्हाला द्या, अशी विनंती केली मात्र अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या असलेल्या माजी खासदारांसह तीन आमदारांना भेट नाकारत महाजन मुंबईला रवाना झाल्याने या घटनेची राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार भेट टाळण्यामागे त्रंबकेश्वर कनेक्शनची जोरदार चर्चा असून सिहस्थाच्या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर नगरपालिकेत आपली सत्ता असावी म्हणून भाजपने शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र त्रंबकेश्वर मध्ये अजित पवार गटाच्या मदतीने शिंदे गटाच्या शिवसेनेकडे नगराध्यक्षपद गेल्याने गिरीश महाजन नाराज झाल्याची चर्चा असून यामुळे भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचच्या युतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राष्ट्रवादी म्हणते….. महाजन यांनी हॉटेल बाहेर भेट नाकारल्यानंतर फोनवरून आमचे बोलणे झाले त्यानंतर पुन्हा दुसऱ्या हॉटेलमध्ये माझ्यासह मंत्री नरहरी झिरवाळ आणि रंजन ठाकरे असे आम्ही भेटून महाजन यांच्याशी चर्चा केल्याचे माजी खासदार भुजबळ यांनी सांगितले.

![]()












