नाशिकचे हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भारती पवार भरणार उमेदवारी अर्ज

नाशिक :गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहराच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असतानाच, आज नाशिक शहरात राजकीय वातावरण देखील तापणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटत नव्हता. रोज नवनवीन चेहऱ्यांची नावे समोर येत होती. मात्र आता नाशिककरांची प्रतीक्षा संपली असून अखेर खासदार असलेले हेमंत गोडसे यांच्या गळ्यात महायुतीच्या शिंदे गटाच्या उमेदवारीची माळ पडली असून आज नाशिक शहरात महायुतीच्या वतीने मोठे शक्तिप्रदर्शन करून रॅली काढण्यात येणार आहे. यादरम्यान नाशिक लोकसभेसाठी शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरी लोकसभेसाठी भाजपच्या भारती पवार या आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन आदी उपस्थित राहणार आहेत. ही रॅली भालेकर मैदानातून निघणार असून ,हेमंत गोडसे यांनी तर इगतपुरीच्या घाटनदेवी पासून सकाळीच रॅलीला सुरवात केली आहे.

![]()












