शिंदे गटाच्या शिवसेनेला व राष्ट्रवादीला दे धक्का

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असून अखेर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी “ब्लॅक अँड व्हाईट” न्यूज मध्ये नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हेच होणार असल्याची बातमी टाकण्यात आली होती ही बातमी खरी ठरली आहे. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर राजकीय उलथापालथ झाली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दादा भुसे हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. मात्र आता भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने गिरीश महाजन हेच पालकमंत्री होण्याची दाट शक्यता व्यक्त होत होती . यादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने पालकमंत्री पदासाठी त्यांचा पत्ता आपोआपच कट झाला होता .मात्र पालकमंत्रीच्या स्पर्धेत शिंदे गटाच्या शिवसेनेचे दादा भुसे व राष्ट्रवादीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे होते. यावेळी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने जिल्हात आमचे जास्त आमदार म्हणून पालकमंत्री आमचाच अशी भूमिका घेतली तर शिंदे गटात मात्र शांतता दिसून आली. त्याचबरोबर होणाऱ्या सिहस्थ कुंभमेळा जिल्हास्तरीय अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती झालेली होती. तर काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तपदी कर्डीले यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली नियुक्ती थांबवत त्या जागी मनपा आयुक्तपदी मनीषा खत्री यांची नियुक्ती करत येणाऱ्या पालकमंत्रीपदी मीच असणार याचे संकेतच गिरीश महाजन यांनी दिले होते. अखेर गिरीश महाजन यांची नियुक्ती करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकवर आपलीच “दादागिरी” असणार हे दाखवून दिले.


![]()












