संभाव्य वृक्षतोडीला महायुतीतील घटक पक्षांचा विरोध

नाशिक : तपोवनात होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडप्रकरणी मनपा प्रशासनाविरोधात सर्वच स्तरावरून आंदोलन सुरू असतानाच भाजपचा मित्र पक्ष सत्तेत सहभागी असणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेने तपोवन वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन केल्याने या प्रकरणात आता भाजप एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे. सिहस्थासाठी तपोवनातील सुमारे 1800 झाडे कापण्याच्या निर्णयानंतर अनेक संस्था आणि राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस व कुंभमेळा मंत्री महाजन या निर्णयाचे समर्थन केले असले तरी साधुग्रामला पर्यायी जागा नाही. त्यामुळे काही झाडे तोडावी लागतील असे सांगितले मात्र पर्यावरणप्रेमींचा विरोध सुरूच आहे. एकीकडे सरकार मधील दोन मंत्री समर्थन करत असताना आज शिंदे गटाच्या शिवसेनेने तपोवनात आंदोलन करत वृक्षतोडी विरोधात आंदोलन केले. तर दुसरीकडे अजित पवारांच्या गटाने देखील नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना वृक्षतोडीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षातच एकमत नसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या या चुकीच्या निर्णयाचा फटका सरकारमधील मंत्र्यांना बसत असून त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.


![]()















