निवडणूक विभागाने जिवंत मतदाराला केले मयत घोषित

नाशिक : शहरात अशी एक घटना घडली आहे की त्यामुळे नाशिककरांना भूतनाथ रिटन्स या चित्रपटाची आठवण नक्की होत असणार. या चित्रपटात भूत झालेला अभिताभ निवडणूक लढवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. नाशिकमधील मतदार यादीतील गंभीर त्रुटीचा एक धक्कादायक प्रकार घडला असून सिडको परिसरातील अर्जुन काळे (वय 45) हा मतदार मयत असल्याचे निवडणूक विभागाने जाहीर केल्यानंतर तो व्यक्ती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोर आला. मी जिवंत असताना देखील मला मयत दाखवत माझे नाव मतदार यादीतुन वगळले असल्याची तक्रार करत त्याने स्वतः जिवंत असल्याचा पुरावा सादर केला. मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन काळे यांचे 2024 च्या मतदार यादीत भाग क्रमांक 305,अनुक्रमांक 1090 वर नाव नोंदवलेले होते. तसेच त्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदानही केले होते. मात्र 2025 ची मतदार यादी तपासताना त्यांचे नाव गायब असल्याचे आढळले. त्यांनी याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार केली असता आमचा संबंध नाही असे सांगून जबाबदारी झटक्यात आल्याचा आरोप काळे यांनी केला. शेवटी काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ही तक्रार दाखल केली. त्यांच्या नावाचा फार्म 7 भरून चुकीचा मोबाईल नंबर टाकत त्यांच्या नावाचा मृत्यू दाखला जोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याबाबत तपासात मृत्यू झालेली व्यक्ती मखमलाबाद येथील असून फक्त नाव सारखे होते. मात्र आई-वडिलांचे नाव संपूर्णपणे वेगळे असल्याचे तपासात आढळल्याचे काळे यांनी सांगितले. या प्रकारामुळे काळे यांना महापालिका निवडणुकीच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यांनी आता राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. असाच प्रकार सिडको परिसरातील एका प्रभागातून इच्छुक असलेल्या अविनाश पाटील यांच्या बाबतीत देखील झाला त्यांना देखील कागदोपत्री मृत घोषित करण्यात आले आहे. हे पाहून आपण जिवंत असल्याचे पुरावे सादर केल्यानंतर देखील त्यांना हायकोर्टातून मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याचे आदेश आणा. त्यानंतर आपले नाव या मतदारयादीत समाविष्ट केले जाईल असा सल्ला त्यांना देण्यात आला. यामुळे त्यांना निवडणूक लढता येणार नसल्याने व अधिकाऱ्यांचं उत्तर ऐकून ते इच्छुक उमेदवार देखील चक्रावले आहेत. याप्रकरणात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

![]()















