भाजपातील अंतर्गत विरोध डावलून झाला भाजप प्रवेश

नाशिक : आज सुधाकर बडगुजर यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश करत कमळ हाती घेतले. मात्र बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे शहरातील स्थानिक भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये “कही खुशी तो कही गमचे” वातावरण असल्याचे स्पष्ट चित्र दिसत होते.शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र या प्रवेशावेळी सकाळपासून अनेक ट्विस्ट पहायला मिळाले. नाशिकमधून हातात भाजपचे झेंडे घेऊन वाहनांचा मोठा ताफा आज भाजप प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने निघाला असताना बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत कल्पना नसल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सर्वानाच पेचात टाकले. बावनकुळे यांच्या वक्तव्याने पक्षातील विसंवाद समोर आला तर स्थानिक नेते देखील नाराज असल्याचे स्पष्ट झाले. बावनकुळे यांनी बडगुजर यांचा वचपा काढला का ? काही महिन्यांपूर्वी संजय राऊत यांनी बावनकुळे यांचे मकाऊच्या कॅसिनोमधील फोटो सोशल मीडियावर वायरल केले होते. राऊत यांच्या आरोपांचे बावनकुळे यांनी त्यावेळी खंडन करत फोटोचा वापर करून संभ्रम निर्माण केला जात असल्याचे सांगितले होते. सुधाकर बडगुजर यांच्याच माध्यमातून फोटो राऊत यांच्यापर्यंत पोहचल्याची चर्चा होती. त्यामुळे बडगुजर यांच्याविषयी मनात ठेवलेला राग आज बावनकुळे यांनी व्यक्त करत वचपा काढल्याची चर्चा होती. ठाकरेंना बडगुजरांचे चॅलेंज ? मी अनेक समाज उपयोगी कामे राबवली पण शिवसेना पक्षाने माझ्यावर कारवाई केली. माझा अनादर केला. त्या पक्षाला सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आता भाजप देईल ती जबाबदारी मी निश्चित पार पाडेल. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर नयना घोलप, माजी नगरसेवक अशोक मुतडक,माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्याबरोबर काही आजी- माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते.मात्र आज खऱ्या अर्थाने सुधाकर बडगुजर यांचा राजकारणातील अवघड प्रवास सुरु झाला असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर नाराज असलेल्या स्थानिक नेत्यांबरोबर बडगुजर कसे जुळून घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल

![]()















