भाजपची महापालिका निवडणुकीआधी मोठी खेळी

नाशिक : महानगरपालिका निवडणुका बघता नाशिक शहरातील वातावरण चांगलेच तापले असून ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर व शरद पवार गटाकडून पंचवटी मतदारसंघातुन विधानसभेची निवडणूक लढवणारे गणेश गिते हे भारतीय जनता पक्षाच्या जहाजात बसण्यासाठी तयार असतानाच या जहाजात बसण्यासाठी अजून काही नावे समोर आल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेला शहरात मोठे धक्के बसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माजी मंत्री बबनराव घोलप पुन्हा एकदा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असून ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक अशोक सातभाई हे सुद्धा पुन्हा भारतीय जनता पक्ष प्रवेश करणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र योगेश घोलप यांना देवळाली मतदारसंघातुन ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होताच बबनराव घोलप यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत योगेश घोलप यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यक्रमांना बबनराव घोलप यांची गैरहजेरी होती. त्यानंतर आता मात्र ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत सुरवातीला भाजप त्यानंतर शिवसेना, मनसे, शरद पवार गट राष्ट्रवादी असा प्रवास करत माजी नगरसेवक अशोक सातभाई पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच भाजपात प्रवेश करणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात असून त्यांच्यासोबत अजून 15 ते 20 नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

![]()















