स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला, गणेश गितेही करणार भाजपात प्रवेश

नाशिक : खा. संजय राऊत यांचे खास असलेले सुधाकर बडगुजर यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाने शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असून बडगुजर यांचा भाजपा प्रवेश होण्याआधीच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध सुरू केला होता. त्यानंतर भाजपा बरोबर बंडखोरी करत शरद पवार गटाकडून पंचवटी मतदारसंघात ढिकले यांच्यासमोर आवाहन उभे करणारे गणेश गिते यांच्या भाजपा प्रवेशालादेखील स्थानिक नेत्यांनी कडाडून विरोध केला होता.बडगुजर व गिते यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करत आमदारांनबरोबर स्थानिक नेत्यांनी मुंबईला धाव घेत वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा देखील केली होती. मात्र अचानकपणे या दोघांना होणार विरोध मावळला असून विरोध करणाऱ्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बडगुजर व गिते यांच्या प्रवेशाची तयारी झाली असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे. मुख्य म्हणजे सुधाकर बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्ता यांच्या समवेत नृत्य व पार्टी करताना चे फोटो भाजप नेते निलेश राणे यांनी विधानसभेत झळकवले होते. यावरून मोठ्याप्रमाणात राजकारण तापले होते.मात्र त्याच सुधाकर बडगुजराना भाजपा आता रेड कार्पेट टाकत असून एकीकडे शतप्रतिशतची भाषा करणाऱ्या भाजपकडून इतर पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्याचे धोरण कायम ठेवल्याने पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू असल्याची चर्चा आहे.

![]()















