अन् दादांनी पुष्पगुच्छ देत हात जोडले…

नाशिक : अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवारी) सकाळी मुंबईतील राजभवन येथे महायुतीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्यासह महायुती सरकारमधील इतर प्रमुख मंत्री उपस्थित होते.

मंत्रीपदावर भुजबळ यांची वर्णी लागली आहे. परंतु भुजबळ यांना कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात आली ते अजून गुलदस्त्यात आहे. मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी भुजबळांकडे देण्यात येईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.त्यादृष्टीने तयारी देखील सुरू झाली असून आज काही महिन्यानंतर मंत्रालयातील धनंजय मुंडे यांचा 204 क्रमांकाचा कक्ष उघडण्यात आला असून याठिकाणी साफसफाई सुरू असल्याचे चित्र होते. साधारण काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक पार पडली. या भेटीनंतर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फोनवरून बोलणं करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि त्यानंतर भुजबळ यांचे मंत्रिपद निश्चित करण्यात आले.

ओबीसी मंत्री मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आल्यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्था निर्माण होती . काही महिन्यातच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसू शकतो.महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत जातीचा फॅक्टर आणि पर्यायाने ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अशावेळी छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या ओबीसी चेहऱ्याला मंत्रिमंडळातून दूर ठेवल्यास राजकीय फटका बसू शकतो हे बघता भुजबळांना मंत्रीपद देऊन ओबीसी समाजाची नाराजी थांबवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे समजते. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यातील संबंध उत्तम आहेत.

भुजबळांचा राजकीय प्रवास ……. १९७३ मुंबई महापालिकेवर छगन भुजबळ पहिल्यांदा नगरसेवक म्हणून गेले. यानंतर १९७३ ते ८४ महापालिकेत विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९८५ साली मुंबईच्या महापौर पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. १९९१ साली त्यांना दुसऱ्यांदा मुंबईचा महापौर बनण्याची संधी मिळाली. मुंबई महापालिकेनंतर त्यांनी १९८५ साली माझगावमधून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते विजयी झाले. यानंतर त्यांनी १९९० साली पुन्हा माझगावमधून विधानसभा लढवली त्यात त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला.१९९१ साली त्यांना महसूल मंत्री पदाची जबाबदारी मिळाली. १९९५ पर्यंत त्यांच्याकडं महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि झोपडपट्टी सुधारणा खात्याचे छगन भुजबळ मंत्री होते. एप्रिल १९९६ साली छगन भुजबळ यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाली. १८ ऑक्टोबर १९९९ ला त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी गृह आणि पर्यटन अशी दोन खाती सांभाळली.एप्रिल २००२ मध्ये छगन भुजबळ यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांनी या खात्यांची जबाबदारी पार पाडली. २००४ मध्ये त्यांनी येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. यात ते विजयी झाले.नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून काम पाहिले. ८ डिसेंबर २००८ रोजी छगन भुजबळ यांनी तिसऱयांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.२००९ मध्ये दुसऱ्यादा, २०१४ मध्ये तिसऱ्यांदा आणि २०१९ मध्ये छगन भुजबळ यांची येवला विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली.महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये २८ नोव्हेंबर २०१९ पासून राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडं होती. महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना २ जुलै २०२३ पुन्हा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.२३ नोव्हेंबर २०२४ पाचव्यांदा येवला विधानसभा मतदासंघातून आमदार म्हणून निवडून आले.त्याचबरोबर १ नोव्हेंबर १९९२ साली छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची देखील स्थापना करण्यात आली होती.

![]()















