
नाशिक : काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असतानाच गिरीश महाजन यांनीही यासंदर्भात नाशिक येथे आपली बाजू मांडली. काही दिवसांपासून माझ्याशी संबंधित फोटो आणि पोस्ट जाणूनबुजून काही समाज माध्यमांवर म्हणजेच सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स व इतर न्यूज पोर्टलवरून प्रसारित करण्यात येत आहेत. या फोटोमधील मुलगी माझ्या घनिष्ठ कौटुंबिक संबंधातील आहे. माझ्या घरगुती, कौटुंबिक व धार्मिक कार्यक्रमात त्यांचे कुटुंबीय व माझे कुटुंबीय एकत्र येत असते. त्यांचे कुटुंबीय आणि माझे कुटुंबीय यांचे माझ्याबरोबर अनेक फोटो आहेत. जे फोटो आमचे खासगी आहेत. फोटोत असणारी मुलगी माझ्या दिवंगत मित्राची मुलगी असून तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर आहे,” असे मंत्री गिरीश महाजन यांनी नमूद केले.माझ्या फोटोमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, मूळ फोटोमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. मी पुनः एकदा सांगतो की, फोटोमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून छेडछाड/ फेरफार करण्यात आला आहे. त्यातून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती नाही. ज्या लोकांनी अशा चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमावर फोटो प्रसारित करून बदनामीचा प्रयत्न केला. त्यांच्याविरुद्ध आम्ही कायदेशीर तक्रार सायबर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची दखल घेऊन संबंधित समाज माध्यमच्या खातेधारकांना सदर मजकूर काढून टाकण्यासाठी कायदेशीर नोटीस दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरु असताना देखील काही समाज माध्यमांत अजूनही बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात येत आहे. अशा खातेधारकांविरुद्ध न्यायालयात जाऊन कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत दाद मागणार आहे “, असेही महाजन यांनी सांगितले. महाजन म्हणाले, “हे फोटो जाणीवपूर्वक आणि एका ठराविक हेतूने शेअर केले जात आहेत. मी या प्रकरणी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीरता ओळखून चिंता व्यक्त केली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे. यामागे नेमका कोणता राजकीय मेंदू आहे याची मला कल्पना नाही, पण यावर खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. त्या पितृछत्र हरवलेल्या मुलीचे लग्न जमवायचे आहे आणि ती जबाबदारी वडिलांच्या नात्याने माझ्यावर आहे, अशा वेळी हे कृत्य करणे अत्यंत पाप आहे. उच्च न्यायालयात जाणार
महाजन म्हणाले, “मी या विकृतीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. हे फोटो सोशल मीडियावर सर्वात आधी कोणी टाकले. आणि ते कोणी कोणी पुढे फॉरवर्ड केले, त्या डिजिटल गुन्हेगारांची संपूर्ण यादी (लिस्ट) माझ्याकडे तयार आहे. सायबर विभागाच्या अहवालानंतर आता हायकोर्टाच्या माध्यमातून या सर्वांना तुरुंगाची हवा दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.

![]()












