
नाशिक : विधान परिषद निवडणुकीत नाशिकमधून धक्कादायक निकाल समोर आल्याचे चित्र आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला असून नाशिकमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी दारुण पराभव केला. गोकुळ गीते यांना ३८९ मतं मिळाली. गोकुळ गीते यांचे भाऊ गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या विजयानंतर गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या निवडणुकीत शिंदेसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत भाजपचे बंडखोर गोकुळ गीते आणि त्यांचे बंधू गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शेवटपर्यंत या दोघांची समजूत काढण्यात आली. अखेर गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता पण गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी देखील स्वत: गोकुळ गीते यांच्यासोबत चर्चा केली होती. तरी देखील त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. मात्र माघार घेतली होती. यादरम्यान देखील त्यांची समजूत काढण्यासाठी मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे यांच्या अनेक वेळेस बैठका झाल्या होत्या. या निवडणुकीत गोकुळ गीते यांचाच विजय झाला. विजयानंतर गीतेंच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला. गोकुळ गीते यांच्या विजयानंतर नरेंद्र दराडे यांनी संताप व्यक्त करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. महायुतीतील सर्व नेत्यांनी आपला घात केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, ‘एकनाथ शिंदे सोडून सर्वांनीच माझा घात केला.’ यावेळी संतप्त झालेल्या नरेंद्र दराडे यांनी जल्लोष करणाऱ्या गोकुळ गीतेच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर एकच गोंधळ उडाला. नाशिकमधील पराभवावर एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महायुती धर्माचे पालन का झालं नाही? असं म्हणत त्यांनी नाराज व्यक्त केली. नाशिकमधले पदाधिकारी आणि उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांनी पराभव का झाला याची माहिती मागवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, विजयी उमेदवार गोकुळ गीते यांना मुंबईला बोलावण्यात आले आहे. मंत्री उदय सामंत यांनी फोन करून गोकुळ गीते यांना मुंबईला बोलावलं. विशेष विमानाने त्यांना नाशिकहून मुंबईला बोलावण्यात आले. यादरम्यान महायुतीमध्ये तिन्ही पक्षांनी दगा फटका केला असा गंभीर आरोप दराडे यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंकडे किशोर दराडे सर्व कैफियत मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. नाशिक अंतिम निकाल
नाशिक एकूण मतदान – 618
अवैध मतदान – 13
वैध मतदान – 605
फायनल कोटा – 303
अपक्ष, गोकुळ गीते – 357
शिवसेना, नरेंद्र दराडे – 248
![]()












