संपूर्ण फोडाफोडीच्या राजकारणात,वाजे कुटुंबाने निष्ठा राखली

नाशिक : ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे दिल्लीतील नाट्यमय घडामोडींनंतर नाशिकमध्ये रेल्वेने दाखल झाले आहेत. दिल्लीत ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंड केले असताना, कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स आणि करोडो रूपयांची विकासकामे अशी प्रलोभने धुडकावून खासदार राजाभाऊ वाजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेशी एकनिष्ठ राहिले. या निष्ठेची पावती म्हणून आज सकाळी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीत अत्यंत जंगी असे स्वागत केले.संपूर्ण फोडाफोडीच्या राजकारणात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनाही गळाला लावण्यासाठी अतोनात प्रयत्न झाले. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे की, प्रत्येक खासदाराला 15 कोटींचे टोकन आणि 100 कोटींच्या विकासकामांची ऑफर दिली गेली होती. 14 एप्रिल रोजी शिंदे गटाचे देहू आणि ठाणे येथील दोन पदाधिकारी राजाभाऊ वाजे यांच्या सिन्नर येथील निवासस्थानी गेले होते. त्यांनी राजाभाऊंचे वडील प्रकाश वाजे यांची अडीच तास मनधरणी केली, परंतु वाजे कुटुंबाने पक्षांतरास स्पष्ट नकार देत निष्ठा राखली. आज रेल्वे स्थानकावर माध्यमांशी संवाद साधताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, ज्या विचारधारेतून मी निवडून आलो त्या विचारधारेशी मी प्रामाणिक आहे. ही समाधानाची भावना आहे. मी जो निर्णय घेतला तो योग्य आहे. ही त्याची पावती आहे. मी प्रामाणिकपणे माझं काम करत आहे. कार्यकर्त्यांचा प्रेम होतच परंतु ते वाढले आहे. मला ऑफर मिळाली नव्हती, मला पाहिजे ते मला मिळत आहे आणि ते माझ्यासाठी खूप आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. वाजे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

![]()












