नाशिकच्या इगतपुरीजवळील भावली धबधब्यावर संतापजनक घटना

नाशिक : नाशिक जिल्हा हा धार्मिक त्याचबरोबर पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.पावसाळा सुरू झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर व इगतपुरी परिसरात धबधबे पाहण्यासाठी कुटुंबासह पर्यटकांची मोठी गर्दी असते मात्र आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे धक्कादायक व संताप जनक प्रकार घडला. नाशिक येथील कुटुंब पर्यटनासाठी गेले असता कुटुंबावर स्थानिक टवाळखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. तरुणीच्या छेडछाडीला विरोध केल्यानंतर १५ किलोमीटर पाठलाग करून कारची तोडफोड करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या अंबड परिसरातील रहिवासी पुनम भागवत या आपल्या कुटुंबासह वीकेंडला निसर्गरम्य भावली धरणावर पर्यटनासाठी गेल्या होत्या. संपूर्ण कुटुंब धबधब्याचा आनंद घेत असताना तिथल्या काही स्थानिक टवाळखोरांनी कुटुंबातील एका तरुणीची छेड काढली. या छेडछाडीला भागवत कुटुंबाने कडाडून विरोध केला आणि टवाळखोरांना जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर पर्यटकांनी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला असता, चिडलेल्या टवाळखोरांनी टोळी जमवून या कुटुंबाचा पाठलाग सुरू केला. हल्लेखोरांनी हातात लाकडी दांडे आणि लोखंडी रॉड घेऊन भागवत यांच्या गाडीचा (कारचा) तब्बल १५ किलोमीटरपर्यंत फिल्मी स्टाईल पाठलाग केला. टवाळखोरांनी केवळ पाठलाग केला नाही, तर रस्त्यात ठिकठिकाणी गाडी अडवून कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.या भयंकर प्रसंगानंतर घाबरलेल्या व भेदरलेल्या पीडित कुटुंबाने थेट नाशिक गाठले आणि या घटनेप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पहिली तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा ग्रामीण भागाच्या हद्दीत घडल्यामुळे आता अंबड पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे पथके तयार करून आरोपींचा कसून शोध घेतला जात. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करत नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ल्यात असे प्रकार घडतातच कसे ? असा सवाल केला असून या गावगुंडांना त्वरित अटक करावी असे मागणी देखील जोर पकडून लागली आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर पर्यटकांचा संरक्षणाचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे

![]()












