महाविकास आघाडीच्या स्वप्नांचा झाला चुराडा

नाशिक : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल घोषित झाल्यानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला तर महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले .खर तर या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काट्याची टक्कर होणे अपेक्षित होते. मात्र आलेल्या निकालांमुळे महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळूच सरकल्याचे चित्र आहे. आज संध्याकाळी हाती आलेल्या निकालांनुसार 288 पैकी महायुतीत भाजप 133 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिंदे गटाच्या शिवसेनेने नेत्रदीपक कामगिरी करत 57 जागांवर विजय मिळवला त्या खालोखाल अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने 41 जागा पटकावत आम्हीच खरी राष्ट्रवादी हे सिद्ध केले . तर इकडे महाविकास आघाडीत कॉग्रेसला फक्त 15 जागांवर समाधान मानावे लागले तर ठाकरे गटाच्या शिवसेनेला देखील 20 च जागा मिळवण्यात यश आले तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे पाच महिन्यापूर्वीच लोकसभेची निवडणूक झाली असताना अवघ्या काही महिन्यातच संपूर्ण चित्रच पालटल्याने महाविकास आघाडीच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे दिसते. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवत 200 चा आकडा पार केला. मात्र या मिळालेल्या घवघवीत यशाची कारणे शोधण्याचा प्रयत्न न्यूज ब्लॅक अँड व्हाईट ने केला तो पुढील प्रमाणे जाती व धर्माचे मुद्दे महत्वाचे ठरले — महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा दिली होती.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “एक हे तो सेफ हे” अशी घोषणा केल्याने महाराष्ट्र ढवळून निघाला होता. याचा मोठा परिणाम मतदारांमध्ये होऊन जात-पात विसरत हिंदू एकत्र आला आणि महायुतीच्या मागे पूर्णपणे उभा राहिला कारण लोकसभेत एक समाज एकत्रित महाविकास आघाडी मागे गेल्याचे देखील मतदारांनी बघितल्याने तो राग देखील मनात होताच.त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात महायुतीने वोट-जिहाद चा आरोप करत असे असेल तर आम्हाला देखील धर्मयुद्ध करावे लागेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. धर्मयुद्ध या वाक्यावरून महाविकास आघाडीने रान उठवले होते.मात्र या सर्व घोषणा निवडणुकीचे चित्र पालटवण्यात महायुतीला फायदेशीर ठरल्या. निर्णायक ठरली लाडकी बहीण — लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला धक्का बसल्यानंतर अलर्ट झालेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दोन कोटी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यावर टाकले जातात. त्यामुळे खुश झालेल्या महिलांचा मतदानाचा मोठा टक्का या निवडणुकीत बघायला मिळाला. आणि निवडणुकीत महायुतीला याचा मोठा फायदा झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ……लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपच्या एका मोठ्या नेत्याने वकत्व केलं होतं की आम्हाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही यामुळे नाराज असलेल्या संघाने लोकसभा निवडणुकीतील प्रचारापासून लांब राहणे पसंत केले होते आणि महायुतीला याची मोठी किंमत चुकवावी लागली होती.मात्र यावेळी सावध पाऊले टाकत भाजपने संघा सोबत मिटींग घेत संघाला विचारात घेतल्याने संघाचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह झाले आणि संघ व मित्र परिवाराने ‘सजग रहो’ अभियान राबवत घरोघरी प्रचार केल्याने शहरात याचा मोठा फायदा मिळाल्याचे विधासभा निवडणुकीत चित्र दिसले. भाजपने माधव पॅटर्न पुन्हा राबवला …… गेल्या लोकसभा निवडणुकीत फेक न्यारेटिव्हमुळे इतर छोट्या जाती भाजप पासून लांब गेल्या होत्या .यावेळी ओबीसी लांब जाऊ नये म्हणून ओबीसी नेत्यांची मोट बांधत बैठका घेण्यात आल्या. त्याचबरोबर मराठा समाज कुठेही दुखावणार नाही याची देखील काळजी भाजपने घेतली .मराठा समाजासाठी देखील योजना भाजपने योजना आणल्या.

![]()












