नाशकात कॉग्रेसला मोठा धक्का

नाशिक : काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक आणि प्रदेश सरचिटणीस राहुल दिवे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा चर्चेचा विषय ठरला होता.राहुल दिवे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जात.माजी नगरसेवक दिवे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या समवेत निवडून आलेल्या माजी नगरसेविका आशा तडवी यादेखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती या दोन्ही माजी नगरसेवकांची भाजप प्रवेशाची चर्चा होती. मात्र आज या दोन्ही नगरसेवकांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे, माजी नगरसेविका आशा तडवी, पूजा नवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जोंधळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख बंटी तिदमे, उपनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक सुर्यकांत लवटे उपस्थित होते.या पक्षप्रवेशामुळे नाशकात कॉग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वी राहुल दिवे यांनी कॉग्रेस पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

![]()












