अपघाताचा बनाव करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक : वाडीवऱ्हे परिसरातील सांजेगाव येथील मिरची हॉटेल-रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या नाशिक येथील सिडको परिसरातील रूपाली पाटील ( वय 34) यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे प्रेमसंबंधातून झालेला खूनाचा प्रकार असल्याचे पोलिस तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे . मिळालेल्या माहितीनुसार सिडको परिसरातील कामटवाडे भागातील शिवनारायण अपार्टमेंट मध्ये वास्तव्यास असणाऱ्या व एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कार्यरत असणार्या विवाहिता रूपाली पाटील व आरोपी दीपक सैंदाणे यांच्यात मागील दोन वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंध होते. मुख्य म्हणजे दोघेही एका सोसायटीत आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी फिरण्यासाठी वाडीवरे शिवारात फिरण्यास कारने गेले होते. परिसरात फिरण्याचा आनंद घेताना दीपक ने मद्यप्राशन केले यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले या वादात रूपाली पाटील यांनी दीपकला पोलीस कारवाईची धमकी दिल्याने त्याचा राग मनात धरून रूपाली पाटील जेव्हा कार खाली उतरल्या तेव्हा दीपकने हॉटेलच्या प्रवेशद्वारावर कार त्यांच्या अंगावर टाकून जागीच ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करत मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात आणला मात्र पोलिसांचा संशय बळावल्याने दिपकला त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दीपकची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत घडलेला प्रकार कथन केला.रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे झटापटीत रूपांतर झाले. त्यानंतर रूपाली कारमधून उतरून रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना दीपकने कार पाठीमागून वेगाने नेत त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांचा मृत्यू झाला. रुपाली पाटील यांच्या पश्चात पती, सात वर्षांची मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे. तर सैंदाणे कुटुंबीयांचा करता पुरुष गजाआड गेला आहे दिपक एका खाजगी कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक पदावर नोकरीला होता. दोघे एका सोसायटीमध्ये वास्तव्यास होते. घटनेनंतर हा प्रकार प्रथमदर्शनी अपघात असल्याचे भासत होते. मात्र, परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी दीपकला तत्काळ ताब्यात घेतले. कसून चौकशीत रूपाली आणि आपले मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

![]()












