शिवसेनानेते संजय राऊत यांची स्थानिक प्रशासन आणि मंत्री महाजन यांच्यावर टीका

नाशिक : शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि सुरू असलेल्या खोदकामांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आज नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी नाशिकमधील ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांसह सामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नाशिक महानगरपालिकेवर धडकला. नाशिकच्या शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून महापालिका प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या मोर्चाच्या ठिकाणी खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या सात नागरिकांचे फोटो लावण्यात आले आहेत. या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांकडून केली जात होती. मोर्चामध्ये एका शिवसैनिकाने यमराजाचा वेश धारण केला होता. नाशिकमधील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत शिवसैनिकांकडून महापालिकेवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. यादरम्यान संजय राऊत यांनी राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. नाशिक शहरात प्रशासनाने लोकांना रस्त्यावरच ‘स्विमिंग पूल’ निर्माण करून दिले आहेत. मी असे काही खड्डे पाहिलेत, ज्यात भाजपचे 80 नगरसेवक आणि शिंदे गटाचे आमदार एकत्र टाकता येतील,” असा शेलक्या शब्दांतील टोला राऊत यांनी लगावला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंवरून त्यांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवले. “माझ्या माहितीनुसार, खड्ड्यात पडून आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, पण प्रशासन हा आकडा लपवत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपले 6 जवान शहीद झाले होते, इथे तर 10 लोक मरण पावले आहेत. हे मृत्यू नसून प्रशासनाने केलेले 10 खून आहेत. या ठेकेदारांवर आणि आयुक्तांवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल केला पाहिजे. गरज पडल्यास आम्ही न्यायालयात जाऊन ‘प्रायव्हेट गुन्हे’ दाखल करू.कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत बोचरी टीका करत राऊत यांनी त्यांना ‘चंपतराय’ आणि ‘कुंभकर्ण मंत्री’ अशी उपमा दिली. “कुंभमेळ्याचे बजेट 15 हजार कोटींवरून थेट 45 हजार कोटींवर नेले आहे. आधी 15 हजार टॉयलेट (शौचालय) बांधणार होते, आता 55 हजार बांधणार आहेत. त्यात 10 हजार ‘व्हीआयपी टॉयलेट’ आहेत! व्हीआयपी टॉयलेट म्हणजे काय तिथे सोन्याचे कमोड असणार आहेत का? कुंभमेळ्याच्या नावाखाली टॉयलेटमध्ये पैसे खाणारा हा भाजपचा आणि गिरीश महाजनांचा ‘जामनेर पॅटर्न’ आहे, जो त्यांनी राज्यात आणला आहे असेही संजय राऊत म्हणाले.


![]()












