नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ

नाशिक : शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असून, रस्ते अपघातांमध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक नागरिक जखमी झाल्याने या प्रश्नावर तातडीने विशेष महासभा बोलावण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार आज सकाळी 11.30 वाजता विशेष महासभेला सुरुवात झाली. महासभेत सिंहस्थ कुंभमेळ्याची अर्धवट कामे, शहरातील खड्डे, एमएनजीएलकडून खोदण्यात आलेले रस्ते आणि विविध विकासकामांचा दर्जा या मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली होती खड्ड्यांचे हे प्रकरण पालकमंत्री पदापासून तर थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल त्यानंतर कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना खडे बोल सुनावले असतानाच नाशिक महानगरपालिकेची विशेष महासभा याच प्रश्नांवर मोठ्याप्रमाणात तापल्याचे चित्र होते. महासभेच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली त्याचबरोबर खड्ड्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

यादरम्यान ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी हाताला आणि डोक्याला बँडेज बांधून, तर काही नगरसेवकांनी व्हीलचेअरवर बसून महापालिकेत प्रवेश केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक रुग्णवाहिकेतून महापालिकेत दाखल झाले. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक अपघातग्रस्त होत असल्याचा संदेश देत या नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे यांनी नाशिकमध्ये चार मंत्री असतानाही शहरातील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले, मात्र शहराची अवस्था काय झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.शहरातील रस्त्यांची दुरवस्था, निकृष्ट दर्जाची कामे आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात यासाठी जबाबदार कंत्राटदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केली.दरम्यान, येत्या आठ ते दहा दिवसांत महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही ठाकरे गटाच्या नगरसेवकांकडून देण्यात आला आहे. अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ठोस आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रुग्णवाहिकेतून महापालिकेच्या आवारात दाखल झाले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा संदेश देत त्यांनी हे प्रतीकात्मक आंदोलन केले. महासभेत खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. विशेष महासभेला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. विरोधी नगरसेवकांनी खड्ड्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली. महासभेत मृतांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव सुरू असतानाच सभागृहाबाहेर आणि त्यानंतर सभागृहात विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाचे नगरसेवक महापौरांच्या आसनव्यवस्थेजवळ पोहोचल्याने परिस्थिती आणखी तापली.मुकेश शहाणेंचा न्यायालयात जाण्याचा इशारा
अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे शहाणे यांनी नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांसंदर्भात महापौरांनी ‘नौटंकी’ असा शब्दप्रयोग केल्याने मुकेश शहाणे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महासभेतील वातावरण आणखी तापले


![]()












