ठाकरे गटाची शिवसेना व कॉग्रेस मध्ये जोरदार रस्सीखेच

नाशिक : नाशिक शहरातील मध्य मतदारसंघामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता असून महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असलेल्या कॉग्रेस पक्षाने मध्य मतदारसंघावर जोरदार दावा केल्याने महाआघाडीतील ठाकरेंची शिवसेना अडचणीत आली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या बैठकित मध्य मतदार संघातून माजी आमदार वसंतराव गिते यांनी निवडणूक लढवावी असा ठराव करण्यात आला होता या ठरावाला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील हिरवा कंदील दिल्याने गिते यांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरू करत प्रत्येक प्रभाग पिंजून काढण्यास सुरवात केल्यानंतर मित्र पक्ष असलेल्या कॉग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून तिखट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. डॉ हेमलता पाटील यांनी तर कॉग्रेस पक्ष मध्य मतदारसंघ लढवणार असल्याचा ठरावच मंजूर झाल्याचे सांगितले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार नितीन भोसले हे इच्छुक असून याच गटाचे माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी तर मध्य मतदार संघात शुभेच्छा बॅनर लावून धुराळाच उडवून दिला आहे. तर दुसरीकडे मनसेतून नगरसेवक झालेले गुलजार कोकणी यांनी देखील मुंबई येथे जाऊन कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेठीगाठी घेत मध्य मतदारसंघावर दावा ठोकला आहे. मुख्य म्हणजे आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोकणी यांनी डॉ शोभा बच्छाव यांच्यासाठी मालेगाव-धुळे मतदारसंघात तळ ठोकला होता. त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून सर्वाधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या यामध्ये पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, युवक जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, माजी महापौर दशरथ पाटील, मविप्रचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे, कॉग्रेस शहराध्यक्ष अँड आकाश छाजेड, प्रदेश सरचिटणीस राहुल दिवे प्रवक्ते डॉ हेमलता पाटील, गुलजार कोकणी,शाहू खैरे,प्रा भालचंद्र पाटील, प्रा अजिनाथ नागरगोजे आदींचा समावेश आहे.जिल्ह्यातील विधानसभेच्या पंधरा पैकी सात जागा कॉग्रेसला हव्यात अशी मागणी कार्यकर्ते पक्ष नेत्यांकडे करत असून यामध्ये प्रामुख्याने शहरातील मध्य मतदार संघावर कॉग्रेसची नजर आहे. यामध्ये आता महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील मध्य मतदारसंघावर दावा केल्याने भाजपाची देखील डोकेदुखी वाढली आहे खुद्द अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे मध्यच्या उमेदवारीसाठी रेस मध्ये आहे. मात्र महायुतीच्या जागा वाटपात विद्यमान आमदार असलेल्या जागा जैसे थे राहण्याची शक्यता बघता ही जागा भाजपकडे राहण्याची शक्यता बघून नवा पर्याय म्हणून रंजन ठाकरे यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसोबत कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतल्याचे कळते आहे त्यामुळे कॉग्रेसच्या मध्य मतदान संघाच्या वाढत्या यादीत रंजन ठाकरे यांची भर पडली आहे.रंजन ठाकरे यांनी या मतदारसंघातुन जोरदार तयारी चालवली असून अनेक ठिकाणी होल्डिंग,मिसळ पार्ट्या, सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटाचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी देखील मध्य मतदारसंघातून चाचपणी सुरू केली आहे. यासाठी त्यांना स्वगृही म्हणजेच शरद पवार गटाकडे जावे लागण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर शिंदे गटाकडून मध्य साठी अजय बोरस्ते इच्छुक असून ते तशी तयारी देखील करत आहेत. दलित-मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या या मतदारसंघात ही मते निर्णायक ठरू शकतात यामुळेच महाआघाडी असो की महायुती दोघांकडे उमेदवारांची स्पर्धा वाढली आहे. सन 2019 मध्ये नाशिक मध्य मतदारसंघात कॉग्रेसच्या हेमलता पाटील आणि भाजपाच्या देवयानी फरांदे यांच्यात सामना रंगला होता. फरांदे यांनी हेमलता पाटील यांचा 28 हजारच्या मतांच्या फरकाने पराभव केला होता. म्हणजेच कॉग्रेसच्या हेमलता पाटील यांनी भाजपाच्या देवयानी फरांदे यांना चांगलीच लढत दिली होती. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मध्य मधून चार हजारांची आघाडी मिळाल्याने ठाकरेंची शिवसेना या मतदारसंघावर वसंतराव गिते यांच्या रूपाने जोरदार दावा ठोकत आहे. यामुळे मध्य मतदारसंघात वाढती स्पर्धा बघता महाविकास आघाडीच्या वतीने बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणी उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे मात्र या ठिकाणी उमेदवार म्हणून ठाकरे गटाचे वसंतराव गिते असणार की कॉग्रेस पक्षाला ही जागा सुटणार हे येत्या दिवसात कळेलच.

“मध्य” साठी मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी –
नाशिक मध्य मतदारसंघात मुस्लिम समाज मोठ्याप्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी मुस्लिम उमेदवार महाआघाडीने देण्याची मागणी जोर धरू लागली असून लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांना मोठ्या प्रमाणात मतदान करून खासदार केल्याने महाआघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येत मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली असून नाशिक मध्यची जागा कॉग्रेस पक्षाला सोडावी अशी मागणी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हनिफ बशीर यांनी केली आहे.

![]()











