महापालिका निवडणुका व आगामी कुंभमेळा बघता बदली महत्वाची

नाशिक : आगामी सिहस्थ कुंभमेळा बघता महाराष्ट्र शासनाने नाशिक महापालिका आयुक्त म्हणून वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर यांना मात्र कुठलीही नियुक्ती देण्यात आलेली नाही . शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या एका वादग्रस्त भूसंपादनाबाबत महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्यावर राजकीय नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात एका रात्रीतून संबंधित भूसंपादनाबाबत 55 कोटी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी करत अदा करण्यात आला होता. याप्रकरणात सत्ताधारी नेत्यांसोबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील रान उठवत शहरातील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संपादित करण्यात आलेल्या 300 हून अधिक जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना गेल्या 20 वर्षांपासून महापालिकेने दिलेला नसताना बिल्डरांवर एका रात्रीतून मेहरबानी का ? असा सवाल आयुक्तांना करण्यात आला होता. याबाबत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राज्य शासनाकडे या संदर्भात चौकशी करण्याची देखील मागणी केली होती त्यांनतर मात्र करंजकर वेळोवेळी रजेवर जात असल्याचे चित्र होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज आयएएस अधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली.कर्डिले हे वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.कर्डिले हे म्हसुरी येथे प्रशिक्षण घेत असून ते २७ किंवा २८ डिसेंबर रोजी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.शासनाचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी या बदलीचे आदेश काढले आहेत. आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही बदली महत्त्वाची मानली जात आहे.

![]()












