सायबर पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल

नाशिक : सोशल मीडियाचा वापर काही समाजकंटक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत असतात असाच काहीसा प्रकार नाशिक शहरात घडला असून मुख्य म्हणजे समाजकंटकांची मजल थेट माजी पोलीस आयुक्तांच्या नावाचा वापर करण्यापर्यंत गेली आहे. याबाबत सायबर पोलिसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे की नाशिकचे माजी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचा 24 सेकंदाचा व्हिडीओ सध्या व्हॉट्सऍपवर प्रसारित होत असून त्यामध्ये मुस्लिम धर्मियांच्या दिवसभरातील पाच वेळेच्या अजानच्या 15 मिनिटे पूर्वी व 15 मिनिटे नंतर मस्जिद परिसराच्या 100 मीटर अंतरामध्ये वाद्य वाजवणे, हनुमान चालीसाचे पठण करणे आदीस बंदी असल्याचे निर्गमित करण्यात आले आहेत. या व्हिडीओबाबत छेडछाड करण्यात आली असून पांडेय सध्या नाशिक शहराचे पोलीस आयुक्त नसताना देखील या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये फक्त नमाजाच्यावेळी इतर धर्मियांना हनुमान चालीसाचे पठण करण्यास मनाई असल्याचा 24 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल करत दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याने व्हिडीओ तयार करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. नेमका प्रकार काय हा व्हिडीओ मूळचा 10 एप्रिल 2022 चा असून तो 4 मिनिटे 42 सेंकदाचा आहे. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मस्जिदवरील भोंग्यांविरोधात आंदोलन पुकारले होते. तत्कालीन कायदा सुव्यवस्था अंमलबजावणीसाठी नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती त्यात काही आदेश देण्यात आले होते मात्र त्यानंतर मूळ व्हिडीओत छेडछाड करून तो सध्या व्हायरल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष ठेवत कडक कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे.

![]()












